प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. प्रिया बापट मु्ख्य भूमिकेत असलेला 'विस्फोट' हा हिंदी सिनेमा अलिकडेच ओटीटवर प्रदर्शित झाला. प्रियासोबत या सिनेमात रितेश देशमुख, फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने या सिनेमाबाबत सांगताना रितेशचं कौतुक केलं.
प्रियाने नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅच अप या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत प्रियाने रितेशच्या कामाचं कौतुक केलं. ती म्हणाली, "रितेश फारच कमाल आहे. कामाच्या बाबतीत तो अत्यंत प्रोफेशनल आहे. वेळ चोख पाळणारा माणूस! रितेश देशमुख, फरदीन खान, संजय गुप्ता असलेली विस्फोट ही माझी पहिली टिपिकल बॉलिवूड स्पेस होती. पण, यांच्या सेटवरचं वातावरण कसं असेल हे मला माहीत नव्हतं. पण रितेश हा अत्यंत प्रोफेशनल आणि अत्यंत प्रामाणिक नट आहे. ८ वाजताच्या कॉल टाइमला तो त्याची वाक्य पाठ करून हातात स्क्रिप्ट घेऊन रेडी बसलेला असतो. आणि या गोष्टींची खूप मदत झाली. रितेश नसता तर हा सिनेमा कसा झाला असता हे मला माहीत नाही".
दरम्यान, संजय दत्तच्या 'मुन्नाभाई MBBS' सिनेमात प्रिया झळकली आहे. तिची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसीरिजही प्रचंड गाजली. या वेब सीरिजमध्ये तिने साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.