Join us

'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार; तर कलर्स मराठीवरील 'या' दोन मालिका बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:07 IST

लवकरच 'बिग बॉस मराठी'चा नवा कोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्याबरोबरच कलर्स मराठीवरील दोन मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. 

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा रिएलिटी शो लवकर सुरू करण्याची मागणी वारंवार प्रेक्षकांमधून केली जात होती. अखेर काही दिवसांपूर्वीच या लोकप्रिय रिएलिटी शोची घोषणा करण्यात आली. लवकरच 'बिग बॉस मराठी'चा नवा कोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्याबरोबरच कलर्स मराठीवरील दोन मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. 

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ व ‘रमा राघव’ या मालिका बंद होणार आहेत. या मालिकेतील कलाकारांनी त्याबाबत केलेल्या पोस्टने या चर्चा रंगल्या आहेत. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामतने मालिकेच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

तर ‘रमा राघव’ ही मालिकाही प्रेक्षकांचं निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने इन्स्टाग्रामवर निखिल दामलेबरोबरचा फोटो शेअर करत "शेवटचे काही दिवस" असं कॅप्शन दिलं आहे. यामुळे या दोन्ही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन येत्या २८ जुलैपासून सुरू होणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ५'चं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. रितेशलाही या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन करताना बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीटिव्ही कलाकार