बड्या बड्या स्टार्सला आपल्या इशार्यांवर नाचवणारा कोरिओग्राफर, डायरेक्टर, अॅक्टर प्रभु देवा (Prabhu Deva ) याचा आज वाढदिवस. प्रभू देवाचं खरं नाव शंकुपानी असं आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथे जन्मलेल्या प्रभुदेवाचे वडील मुगूर सुंदर हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. त्याने त्यांच्याकडूनच लहानपणापासून नृत्याचे धडे गिरवले.
प्रभुदेवाच्या करिअरबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच, पण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला ठाऊक आहे? प्रभुदेवाच्या खासगी आयुष्य कायम वादळी राहिलं. एकीकडे तो यशाची एक एक पायरी चढत होता. दुसरीकडे खासगी आयुष्यातील एका पाठोपाठ एक अशा अडचणी त्याचा पिच्छा पुरवत होत्या. 1995 साली प्रभुदेवाने रामलतासोबत लग्न केलं. दोघांना तीन मुलं देखील झालीत. 2008 मध्ये यापैकी एका मुलाचं कन्सरनं निधन झालं.
याचदरम्यान प्रभुदेवाच्या आयुष्यात नयनतारा (Nayanthara) नावाचं वादळ आलं आणि या वादळानं प्रभुदेवाच्या अख्ख्या आयुष्यात जणू थैमान घातलं. होय, तीन मुलांचा बाप असलेला प्रभुदेवा अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडला. अगदी तिच्यासाठी पत्नी व मुलांना सोडून नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. प्रभुदेवाची पत्नी लताला ही गोष्ट कळली आणि तिने थेट फॅमिली कोर्टात धाव घेतली. नयनताराने माझ्या पतीशी लग्न केलं तर मी उपोषणावर बसेल, अशी धमकीच लताने दिली. या प्रकरणाचा इतका बोभाटा झाला की, रस्त्यावर नयनताराचे पुतळे जाळले गेलेत. यातून सहीसलामत सुटण्यासाठी आमच्यात असं काहीही नाही, असे नयनताराने अगदी शिरजोरपणे सांगितलं होतं. पण प्रभुदेवापासून दूर राहणं नयनताराला देखील शक्य नव्हतं. प्रभुदेवा तर तिच्या प्रेमात जणू आंधळा झाला होता.
अखेर नयनतारासाठी प्रभूदेवानं एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचं 16 वर्षांचं नातं तोडत 2011 मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. यापोटी प्रभूदेवाला 10 लाख रुपये, शिवाय 20 ते 25 कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असं सगळं पत्नीला द्यावं लागलं. आत्ता तरी नयनताराचं प्रेम आपल्याला मिळेल, असा त्याचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसलाच. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडलं त्या नयनताराने 2012मध्ये प्रभूदेवासोबतचं नातं संपल्याचं जाहीर केलं. नयनतारा मिळाली नाहीच. शिवाय प्रभुदेवाचं ‘दिवाळं’ निघालं ते वेगळंच. त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली.