सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय किर्तीचा गायक म्हणजे मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनच्या गाण्यांनी आणि त्याच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावलं. आज मायकल जॅक्सन आपल्यात नसला तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. मायकल जॅक्सनच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला. मायकल जॅक्सनची मुलगीही गायिका असून तिचं नाव पॅरिस. वयाच्या २६ व्या वर्षी गायिका आणि मॉडेल असलेल्या पॅरिसने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुड्याची बातमी सर्वांना सांगितली आहे.
मायकल जॅक्सनच्या मुलीचा साखरपुडा
पॅरिसने पोस्ट करुन लिहिलंय की, "हॅपी बर्थडे माय स्वीट ब्लू. या वर्षात मी तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांचा अनुभव शब्दात सांगू शकत नाही. मी तुझ्याशिवाय कोणासोबतही असे क्षण जगले नसते. मला तुझ्या आयुष्यात स्थान दिलंस त्यासाठी धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करते." अशी पोस्ट लिहून पॅरिसने दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पॅरिस आणि तिच्या बॉयफ्रेंडचे रोमँटिक क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.
फोटोमध्ये पाहता येईल की गुडघ्यावर बसून जस्टिन लाँग हा पॅरिसचा बॉयफ्रेंड तिला प्रपोज करताना दिसतो. २०२२ पासून पॅरिस आणि जस्टिन यांची प्रेमकहाणी सुरु झाली. पॅरिसने सुद्धा वडील मायकल जॅक्सन यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन संगीतक्षेत्रात तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. 'विल्टेड' नावाच्या अल्बममधून पॅरिसला खूप लोकप्रियता मिळाली. हा अल्बम २०२० ला रिलीज झाला होता. पॅरिसचा साखरपुडा झाल्याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय.