-संजय घावरेमुंबई : फसवणुकीची फौजदारी तक्रार दाखल असलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी चॅनेलने कर्मचाऱ्यांचा जवळपास दीड कोटी रुपयांचा पगार थकवल्याचा आरोप माजी मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकाऱ्याने केला आहे.
‘प्लॅनेट मराठी’ विरोधात ७ कोटींच्या फसवणुकीची तक्रार, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेक माजी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला.
प्लॅनेट मराठीमध्ये दोन वर्षे मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी आणि लेखापाल या पदावर काम केलेले आर्यन नारकर म्हणाले की, पगार वेळेवर मिळत नसल्याने जुलै २०२४ मध्ये मी राजीनामा दिला. त्यानंतर मला थांबवले व इन्कम टॅक्सचे काम करून दे, अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.
त्यानुसार सहा महिने थांबलो आणि काम पूर्ण केले. त्या सहा महिन्यांत फक्त एकदा पगार मिळाला. माझा सात-आठ लाख रुपये पगार बाकी आहे. मी राजीनामा दिला तेव्हा १५ कर्मचाऱ्यांचा जवळपास दीड कोटी रुपये पगार थकला होता. सुरुवातीला ४५-५० कर्मचारी होते, पण हळूहळू कमी झाले. सोडून गेलेल्यांना पगारावर पाणी सोडावे लागल्याचे नारकर म्हणाले.
८ कोटी रुपयांचा दावा
‘प्लॅनेट मराठी’च्या माजी सहसंस्थापक सौम्या विळेकर म्हणाल्या, ‘छत्रपती ताराराणी’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे १० कोटी रुपयांचे देणे आहे. काही प्रसारमाध्यमांचेही पैसे थकविले आहेत. व्हर्से इनोव्हेशनने ८ कोटी रुपयांचा दावा केला आहे.
‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते दुबईच्या क्रिएटिव्ह वाईबने
१५ कोटी रुपयांहून अधिक थकल्याने आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केली आहे. प्लॅनेटवर ६० कोटी रुपयांचे कर्ज असेल. शेअर्स विकता येऊ नयेत, यासाठी उच्च न्यायालयात अपील केले.
पैसे आल्यावर कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील. प्लॅनेट मराठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सौम्या विळेकर यांनी सुरू केला आहे. माझ्या तसेच व्यवस्थापनाविरुद्ध केलेले आरोप खोटे, निराधार आणि बदनामीकारक आहेत. काही व्यावसायिक वाद आहेत, जे पूर्णतः नागरी स्वरूपाचे असून त्यांना फसवणुकीचे स्वरूप देणे हास्यास्पद आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रत्यक्षात मी आणि प्लॅनेट मराठी ग्रुप त्यांच्या कृतीमुळे फसवले गेलो असून, आमचे वकील या प्रकरणाला योग्य ते उत्तर देत आहेत आणि आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली तरी आम्ही ती समर्थपणे लढू. -अक्षय बर्दापूरकर, प्रमुख संस्थापक, प्लॅनेट मराठी