Birthday special : आमिर खानच्या अनौरस मुलाबाबत तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:57 IST
14 मार्चला आमिर खानने 52 वर्षात पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या करियर आणि खाजगी आयुष्याविषयी......
Birthday special : आमिर खानच्या अनौरस मुलाबाबत तुम्हाला माहीत आहे का?
14 मार्चला आमिर खानने 52 वर्षात पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या करियर आणि खाजगी आयुष्याविषयी...आमिर खानच्या घरातूनच त्याला अभिनयाची शिकवण मिळाली. त्याचे वडील ताहिर हुसैन हे प्रसिद्ध निर्माते असून त्याचे काका नासिर हुसैनदेखील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. आमिरने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने यादो की बारात या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती त्याच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर 11 वर्षांनंतर तो होळी या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी बनवला होता. कयामत से कयामत तक हा आमिरचा पहिला हिट चित्रपट ठरला. या चित्रपटात आमिर खान जुही चावलासोबत झळकला होता. या चित्रपटातील आमिर आणि जुहीच्या अभिनयासोबतच त्यांची जोडी प्रचंड गाजली. या चित्रपटाने आमिर आणि जुहीला स्टार बनवले. या चित्रपटासाठी आमिरला अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते. कयामत से कयामत तक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आमिर खानचे लग्न झाले होते. त्याने वयाच्या केवळ 21 व्या वर्षी लग्न केले होते. त्याने इतक्या लहान वयात लग्न करणे त्याच्या कुटुंबीयांना पसंत नव्हते. त्याची पत्नी रीना दत्ता कयामत से कयामत तक या चित्रपटातील पापा कहेते है या गाण्यातदेखील झळकली होती. लग्नाचा करियरवर परिणाम होऊ नये यासाठी आमिरने त्याचे लग्न कित्येक दिवस मीडियापासून लपवून ठेवले होते. आमिर आणि रीनाला जुनैद आणि इरा अशी दोन मुले आहेत. 16 वर्षांच्या संसारानंतर आमिरने रीनाला घटस्फोट दिला आणि लगान या चित्रपटात आशुतोष गोवारिकरची सहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या किरण रावसोबत लग्न केले. त्या दोघांना आझाद हा एक मुलगा आहे. कयामत से कयामत तक या चित्रपटानंतर त्याने काही फ्लॉप चित्रपट दिले. पण त्यानंतर जो जिता वही सिकंदर, दिल यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. या चित्रपटांच्या यशानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्याने राजा हिंदुस्तानी, अंदाज अपना अपना, सरफरोश यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. एकामागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर आमिरला मिस्टर परफेक्शनिस्टचा किताब देण्यात आला. आमिरने लगान, रंग दे बसंती, गजनी, धूम 3, पीके, दंगल यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. आमिर खान हे आज बॉलिवूडमधील एक मोठे नाव मानले जाते तरीही तो कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत नाही. पुरस्कारांवर त्याचा विश्वासच नाही असे त्याचे म्हणणे आहे. आमिरच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. ब्रिटेनच्या जेसिका नावाच्या महिला पत्रकारासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या एका मासिकाने दिल्या होत्या. या मासिकानुसार गुलाम या चित्रपटाच्या सेटवर आमिर आणि जेसिकाची ओळख झाली होती आणि ते दोघे लिव्ह इन मध्ये राहायला लागले होते. जेसिकाला दिवस गेल्यानंतर गर्भपात करण्यासाठी आमिरने दबाव टाकल्याचाही दावा या मासिकाने केला होता. या मासिकानुसार, जेसिकाने आमिरच्या मुलाला जन्म दिला असून ती तिच्या या मुलासमवेत लंडनमध्ये राहाते. आमिरसाठी यंदाचे वर्षं तर खूप चांगले गेले आहे. आमिरच्या दंगल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. सध्या तो ठग्स ऑफ हिंदोस्ताँ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे सगळेच चित्रपट 300 कोटींच्या जवळपासच व्यवसाय करत आहेत.