Join us

"२१ दिवस झाले सिगारेट ओढली नाही...", 'पंचायत' फेम अभिनेत्याची पोस्ट, हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:08 IST

आसिफचे हॉस्पिटलमधले हे फोटो पाहून चाहते पुन्हा चिंतेत आहेत. पण हॉस्पिटलमधले हे आधीचेच फोटो आसिफने शेअर केले आहेत.

'पंचायत' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये दामादजीची भूमिका साकारून अभिनेता आसिफ खानला प्रसिद्धी मिळाली. काही दिवसांपूर्वीच आसिफला प्रकृतीच्या काराणास्तव मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हार्ट अटॅक नव्हे तर गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स हा आजार झाल्याचं आसिफने स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा आसिफने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

आसिफचे हॉस्पिटलमधले हे फोटो पाहून चाहते पुन्हा चिंतेत आहेत. पण हॉस्पिटलमधले हे आधीचेच फोटो आसिफने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने हेल्थ अपडेट दिले आहेत. गेल्या २१ दिवसांपासून सिगारेट ओढली नसल्याचंही त्याने सांगितलं आहे. "असं म्हणतात की २१ दिवसांत कोणतीही चांगली वाईट सवय बदलते. आज २१ दिवस झाले मी सिगारेट ओढलेली नाही. आज फ्रेंडशिप डे आहे. माझ्या मित्रांवर मी किती प्रेम करतो हे सांगण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. जीवनात चढ-उतार येत असतात. जेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा सगळे तुमच्यासोबत असतात. पण, जे वाईट दिवसांतही माझ्यासोबत राहिले त्या सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे", असं आसिफने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे तो म्हणतो, "तुमच्या चुकांची जाणीव होण्यासाठी, योग्य व्यक्तींना ओळखण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वाट पाहू नका. या मोठ्या शहराच्या मोठमोठ्या गोष्टींमध्ये हरवून जाऊ नका. तुमचं साधेपण तुमच्यासोबत राहू द्या. चहाचा आस्वाद घ्या. लोकांचं पाहून ब्लॅक कॉफीच्या नादाला लागू नका. मित्रांना रोज भेटा. २०-३० रुपयांत तुमच्या आयुष्याचा करार करू नका. हे वाचून मी नंतर कदाचित हसेनही". पोस्टच्या शेवटी आसिफने हे जुने फोटो असून आता मी घरी असून पहिल्यापेक्षा स्ट्राँग असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीवेबसीरिज