जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचं समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आता या भ्याड हल्ल्यावर शाहरुख खान आणि सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शाहरुख खानने जम्मू काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्याने X अकाऊंटवरुन ट्वीट करत जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "पहलगाममध्ये झालेली हिंसा आणि अमानवी कृत्याने दु:ख होत आहे. याबद्दलचा राग मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. अशा कठीण काळात आपण फक्त पीडित कुटुंबीयांसाठी प्रार्थना करू शकतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे. आणि या घृणास्पद कृत्याविरोधात न्याय मिळवला पाहिजे", असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सलमान खाननेही त्याच्या X अकाऊंटवर ट्वीट केलं आहे. "पृथ्वीवरील स्वर्ग असलेलं काश्मीर नरकात बदलत आहे. निर्दोष लोकांना टार्गेट केलं जात आहे. एकाही निर्दोष व्यक्तीला मारणं हे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखं आहे", असं सलमानने म्हटलं आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहे. पहलगाममधील बैसरन येथे एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर आणखी तीन दहशतवादी हे त्यांच्या कारवाईवप लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे.