सूरज बडजात्या आणि सलमान खान या दोघांचं समीकरण चाहत्यांसाठी नवीन नाही. सूरज बडजात्या यांच्या अनेक सिनेमांमध्ये सलमान खानने काम केलंय. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कोन', 'प्रेम रतन धन पायो', 'हम साथ साथ है' अशा अनेक सिनेमांमध्ये सलमान खान झळकला. परंतु नुकत्याच हाती आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार एक अशी बातमी समोर येतेय ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात सलमान खान नव्हे तर बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्याला काम करण्याची संधी मिळाली आहे.
हा अभिनेता घेणार सलमानची जागा
पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सूरज बडजात्या त्यांच्या आगामी सिनेमामध्ये पुन्हा एकदा कौटुंबिक मनोरंजनात्मक कथानक सर्वांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या आगामी सिनेमात भारतीय संस्कृतीच्या मूल्यांना जोडणारी कथा दिसणार आहे. बडजात्यांच्या आगामी सिनेमात सलमान खान नव्हे तर आयुषमान खुराणा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. आयुषमानला सिनेमाची स्क्रीप्ट खूप आवडली असून सध्या सिनेमासंबंधी अभिनेता बोलणी करत आहे.
पुढील वर्षी सुरु होणार शूटिंग
सूरज बडजात्या त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पुढील वर्षी अर्थात २०२५ पासून करणार आहेत. या सिनेमात आयुषमान खुराणा प्रेमची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्यामुळे आयुषमान प्रेमची भूमिका कशी साकारतो याची सर्वांना उत्सुकता आहे. याशिवाय आयुषमानसोबत प्रमुख अभिनेत्री कोण असणार, हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे बडजात्यांच्या आगामी सिनेमात सलमानच्या ऐवजी आयुषमान कशी कमाल करतो, याची सर्वांना आतुरता आहे.