Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nimmi Death : मूल होत नसल्याने निराश होत्या निम्मी, बहिणीच्या मुलाला घेतले होते दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 10:33 IST

Nimmi Death : निम्मींबद्दलच्या काही खास गोष्टी...

ठळक मुद्देनिम्मी यांची आई गायिका व अभिनेत्री होत्या.

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांनी काल अखेरचा श्वास घेतला. गतकाळातील निम्मी त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जात.निम्मींच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. जाणून घेऊ या, निम्मींबद्दलच्या काही खास गोष्टी...

निम्मी यांचे खरे नाव नवाब बानो होते. वयाच्या केवळ 16 व्या वर्षी त्यांनी अभिनय सुरु केला. 1950 -60 च्या दशकात त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या.

सजा, आन, उडन खटोला, भाई भाई, कुंदन, मेरे महबूब, पूजा के फूल, आकाशदीप, लव्ह अ‍ॅण्ड गॉड अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केले.

निम्मी यांच्या करिअरमध्ये राज कपूर यांचे खास योगदान होते. त्यांनीच नवाब बानो हे नाव बदलून त्यांचे निम्मी हे नामकरण केले होते.

अंदाज या सिनेमाच्या सेटवर राज कपूर यांची निम्मींशी भेट झाली होती. यानंतर राज कपूर यांनी निम्मींना बरसात या सिनेमात ब्रेक दिला. यात निम्मी सेकंड लीडमध्ये होत्या. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यानंतर निम्मींच्या घराबाहेर निर्मात्यांच्या रांगा लागल्या.

निम्मी यांना हॉलिवूडच्याही आॅफर आल्या होत्या. निम्मी यांनी स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. मला चार हॉलिवूड चित्रपटांच्या आॅफर आल्या होत्या. पण मी त्यांना नकार दिला. कारण मला बॉलिवूडमध्येच करिअर करायचे होते, असे त्यांनी सांगितले होते.

निम्मी यांनी एस अली राजा यांच्यासोबत लग्न केले होते. राजा हे स्क्रिनराइटर होते. 2007 मध्ये निम्मींच्या पतीचे निधन झाले. निम्मी यांनी एका मॅगझिनमध्ये एस अली राजा यांचा फोटो पाहिला होता. निम्मी यांच्या हेअरड्रेसरने निम्मी यांना अली यांचा फोटो दाखवून तू याच्याशी लग्न का करत नाहीस? असे विचारले होते. निम्मी यांचे को-अ‍ॅक्टर मुकरी यांनीही निम्मीला हाच सल्ला दिला होता. निम्मी यांना हा सल्ला भावला आणि पुढे निम्मी यांनी एस अली राजा यांच्यासोबत लग्न केले.

निम्मी यांना अपत्य नव्हते. यामुळे निम्मी कमालीच्या नैराश्यात गेल्या होत्या. यानंतर निम्मी यांनी आपल्या लहान बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले होते.

निम्मी यांची आई गायिका व अभिनेत्री होत्या. तर वडील मिल्ट्री कॉन्ट्रॅक्टर होते. निम्मी 11 वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.

टॅग्स :निम्मी