'लागिर झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) सतत चर्चेत येत असते. तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. निखिल नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत पोस्टद्वारे चाहत्यांना अपडेट देत असतो. छोटा पडदा आणि रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आता निखिल रंगभूमीकडे वळला आहे. एक नाही तर तो दोन नाटकात काम करताना दिसणार आहे.
आता निखिल चव्हाण रंगभूमी गाजवणाऱ्या देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' या नाटकातून रंगभूमी गाजवणार आहे. या नाटकात अभिनेता अंकुश चौधरीने साकारलेले पात्र आता निखिल साकारणार आहे. आजवर या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिले आहेत आणि आता यानंतर निखिलही त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकायला सज्ज झाला आहे. याशिवाय निखिल अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर 'तू तू मी मी' या नाटकात रंगभूमी शेअर करत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखीत व दिग्दर्शित 'तू तू मी मी' या नाटकांत देखील निखिल अंकुश चौधरीने साकारलेली भूमिका साकारत आहे.
''भरत सरांमुळे मी रंगभूमीशी जोडला गेलो.''
या दोन्ही नाटकांबद्दल बोलताना निखिल म्हणाला, "आजवर मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. आता मी रंगमंचावर परतलो असून एक नाही तर दोन नाटक एकाचवेळी मी सादर करत आहे. 'ऑल द बेस्ट' हे नाटक कोणालाच नवीन नाही आणि अशा गाजलेल्या नाटकांत मला काम करण्याची संधी मिळतेय हे माझे भाग्य. ऑल द बेस्ट मध्ये मी आंधळ्याची भूमिका साकारत आहे जे बरेच चॅलेंजिंग आहे. देवेंद्र सर आणि मयुरेशने खूप उत्तमरित्या तालमी घेतल्यामुळे मला ते सहज सोप्पे झाले. भरत सरांमुळे मी रंगभूमीशी जोडला गेलो. आजवर सर्व प्रेक्षकांनी माझ्या कामाचे नेहमीच कौतुक केले आहे आणि आता रंगमंचावरीलही माझ्या अभिनयाला तशीच दाद मिळेल अशी आशा करतो".