Hrithik Roshan : रोशन कुटुंब हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कुटुंब आहे. या कुटुंबाबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. राकेश रोशन आणि हृतिक रोशन ही बाप-लेकाची जोडी तर लोकप्रिय आहे. हृतिक रोशन एक उत्तम अभिनेता आहे. त्यांचे वडील राकेश रोशन हे निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेते आहेत. तर काका राजेश रोशन हे संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार आहेत. हृतिकचे आजोबा रोशन लाल नागरथ हे देखील संगीत दिग्दर्शक होते. या रोशन कुटुंबाच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारी 'द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.
'द रोशन्स' प्रदर्शनासाठी सज्ज झाली असून लवकरच Netflix वर स्ट्रीम होणार आहे. 'द रोशन्स' या डॉक्यु-सीरिजमध्ये तीन पिढ्यांनी बॉलिवूडवर कसे राज्य केले, हे दाखवण्यात येणार आहे. नेटफ्लिक्सने डॉक्युमेंट्री सीरीजचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. नव्या वर्षात 17 जानेवारी 2025 रोजी ही डॉक्यु-सीरिज प्रसारित केले जाईल. चाहत्यांनामध्ये सीरिजमधील मोठी उत्सुकता आहे.
या सीरिजमध्ये रोशन कुटुंबाशिवाय इंडस्ट्रीतील अनेकांच्या मुलाखतीही पाहायला मिळणार आहेत. रोशन्स सीरिजचे दिग्दर्शन शशी रंजन यांनी केले आहे. राकेश रोशन यांनी या मालिकेची सहनिर्मिती केली आहे. शाहरुख खान, प्रियांका चोप्रा जोनास आणि विकी कौशलचे वडील शाम कौशल देखील यात दिसणार आहेत.
रोशन कुटुंबाविषयी...
हृतिकने 1980 मध्ये 'आशा' चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती, मात्र त्याने 2000 मध्ये 'कहो ना... प्यार है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. आता तो 2025 मध्ये 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. तो शेवटचा 'फायटर' चित्रपटात दिसला होता. राकेश रोशन यांनी 70, 80 आणि 90 च्या दशकात जवळपास 84 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर राजेश रोशन 'काबिल' ते 'क्रिश 3', 'कोई... मिल गया' आणि 'कहो ना... प्यार है' पर्यंतच्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक आहेत.हृतिकच्या आजोबांबद्दल सांगायचे तर, ते चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम शोधण्यासाठी पंजाबहून मुंबईत आले होते. मोहम्मद रफी, मुकेश आणि तलत मेहमूद यांसारख्या दिग्गजांसह त्यांनी काम केलं आहे.