मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते यशाच्या शिखरावर असतात. पण नंतर मात्र हे अभिनेते अचानक गायब होतात. याच अभिनेत्यांना गंभीर परिस्थितीशी तोंड द्यावं लागतं. मराठी सिनेसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्री गाजवणारा असाच एक अभिनेता गेल्या काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होता. हा अभिनेता म्हणजे विकास समुद्रे. 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात विकासने चिपळूणच्या व्यक्तीची लोकप्रिय भूमिका साकारली. विकासने ब्रेन हॅमरेजसारख्या गंभीर आजाराला तोंड दिलं.
विकासला झालेला ब्रेन हॅमरेज
२०१८ मध्ये विकासला ब्रेन हॅमरेजचं निदान झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विकासची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी त्याच्या कुटुंबियांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं. त्यावेळी विकासच्या प्रकृतीबद्दल कळताच एकनाथ शिंदेंनी त्याला मदत केली होती. पुढे या आजाराशी झुंज देऊन विकास अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वापासून काहीसा दूर होता. नंतर विकासने आराम करुन संतोष पवार यांच्या 'सुंदरा मनामध्ये भरली' नाटकाद्वारे पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं. या नाटकात विकासने चक्क दुहेरी भूमिका साकारली होती.
विकासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'फू बाई फू' या टीव्ही शोमधून विकासला अमाप लोकप्रियता मिळाली. विकासने या शोमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. विकासने या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं. विकासने पुढेही विविध टीव्ही शो आणि पुरस्कार सोहळ्यातून कॉमेडी भूमिका केल्या. विकास ठणठणीत बरा होऊन पुन्हा एकदा सर्वांना खळखळून हसवेल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.