Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागराज मंजुळे यांच्या पत्नी अन् मुलाला बघितलंत का? 'घर बंदुक...' मध्ये लेकाचीही आहे भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 09:05 IST

नागराज मंजुळे यांच्या पत्नी गार्गी निर्मात्या आहेत.

'सैराट' (Sairat) फेम नागराज मंजुळे (Nagraj Manjule) म्हणजे मराठीतील सर्वात हटके दिग्दर्शक. प्रत्येक वेळी ते काही ना काही नवीन विषय घेऊन सिनेमा बनवतात. पहिल्याच सिनेमातून कमालीची प्रसिद्धी मिळूनही खऱ्या आयुष्यात ते अगदीच साधे आहेत हे देखील अनेकांना माहितच असेल. सध्या ते आगामी 'घर बंदुक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान पहिल्यांदाच त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला समोर आणलंय.

नागराज मंजुळे असा दिग्दर्शक ज्यांच्या सिनेमाची लोक आतुरतेने वाट पाहतात. सोलापूरमधील करमाळा या छोट्या गावीच ते लहानाचे मोठे झाले. मात्र त्यांचं टॅलेंट त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. नागराज यांच्या सिनेमाविषयी, त्यांच्या टीमविषयी तर सर्वांना माहिती आहेच पण त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारशी कोणाला कल्पना नाही. 'घर बंदुक बिरयानी' च्या प्रमोशनदरम्यान नागराज अण्णांनी पहिल्यांदाच पत्नी आणि मुलाची ओळख करुन दिली. 

नागराज मंजुळे यांच्या पत्नीचं नाव गार्गी तर लेकाचं नाव राया असं आहे. सिनेमाच्या प्रमोशनला एके ठिकाणी नागराज अण्णांनी सहपरिवार हजेरी लावली आणि कुटुंबाची ओळखही करुन दिली. त्यांच्या पत्नी गार्गी या सिनेनिर्मात्या आहेत. नागराज मंजुळेंच्या आटपाड प्रोडक्शन हाऊसचं काम त्या स्वत: पाहतात. तर त्यांचा मुलगा राया याने 'घर बंदुक बिरयानी' मध्ये छोटीशी भूमिका साकारली आहे. 

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न अगदी लहान वयात झालं होतं. त्यानंतर करिअरच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.

'घर बंदुक बिरयानी' हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. सिनेमात स्वत: नागराज मंजुळे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील तसंच अभिनेते सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडले असून आता चित्रपटाची उत्सुकता आहे.

टॅग्स :नागराज मंजुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपटपरिवारव्हायरल फोटोज्