Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री बंगल्यात खून अन्...; मुक्ता बर्वे-प्रिया बापटच्या 'असंभव' सिनेमाचा हादरवणारा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:28 IST

'असंभव' सिनेमाचा टीझर पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

मराठी प्रेक्षकांसाठी येत्या काही महिन्यांत दमदार आणि उत्कृष्ट कथा असणाऱ्या मराठी सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. नवीकोरी कथा आणि वेगळे विषय असलेले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच चर्चा रंगली आहे ती 'असंभव' या हॉरर सिनेमाची. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

'असंभव' सिनेमाचा १.०४ मिनिटांचा टीझर उत्कंठावर्धक आहे. या टीझरमध्ये सुरुवातीला एक बंगला दाखवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी बंगल्यात कोणीतरी शिरल्याचं दिसत आहे. ती व्यक्ती कोणाचा तरी शोध घेत असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. त्यानंतर एका रुममध्ये बेडवर झोपलेल्या व्यक्तीच्या पोटात ती चाकू घुसवून तिचा खून करते. टीझरच्या शेवटी एक बाई जोरात किंचाळल्याचं ऐकू येत आहे. 'असंभव' सिनेमातून एक अद्भूत प्रेम कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये दाखवलेल्या या खूनामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी हा सिनेमा प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे. 

'असंभव' सिनेमात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी अशी स्टारकास्ट असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री यांनी केलं आहे. पण, या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. २१ नोव्हेंबरला 'असंभव' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेप्रिया बापटसचित पाटीलपुष्कर श्रोत्री