Join us

करण जोहरने शेअर केला धोनीचा रोमँटिक Video, लव्हर बॉय अवतारात दिसतोय 'माही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:10 IST

दिग्दर्शक करण जोहरने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा रोमँटिक Video शेअर केला आहे.

Karan Johar Shared MS Dhoni Video :टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अजूनही क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. वयाच्या ४३व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनी हा एक मोठा ब्रँड आहे. आजही त्याचे लाखो करोडो चाहते आहेत. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. सीएसकेकडून जेव्हा धोनी खेळतो, तेव्हा त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते  नेहमीच उत्सुक असतात. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात धोनी हा क्रिकेटच्या मैदानात नाही तर एका 'लव्हर बॉय'च्या अवतारात दिसत आहे.  क्रिकेटनंतर धोनी आता अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित राहिला आहे.

आयपीएलमध्ये सीएसके सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी हा करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये 'लव्हर बॉय'ची भूमिकेत आहे. करण जोहरने धोनीच्या या नवीन अवताराची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली. यामध्ये करण जोहरने एमएस धोनीचा रोमँटिक अवतार दाखवणारी एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये क्रिकेटपटू रोमँटिक अंदाजात दिसत आहे. 

या व्हिडीओच्या सुरुवातीला 'पहिल्यांदाच, एमएस धोनी रोमँटिक अवतारात' हे वाक्य झळकतं. त्यानंतर हातात  रेड हार्ट बलून घेतलेल्या धोनीची एन्ट्री होते आणि तो म्हणतो, 'तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक प्रवास सुंदर बनवतेस'. यानंतर पुन्हा 'अनोखी प्रेमकथा लवकर..." हे वाक्य दिसतं आणि व्हिडीओ संपतो. 

करण जोहरने या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहलं की, "तर सादर करत आहोत माहीचा नवा अंदाज... आमचा लव्हर बॉय... पण या कथेत एक ट्विस्ट आहे. कारण माहीचं पहिलं प्रेम त्याची बाईक हे काही नवीन नाही.  ही प्रेमकथा ब्लॉकबस्टर होणार आहे", असं म्हटलं. हा व्हिडीओ पाहिल्यावर तो एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरसारखा वाटतोय. पण,  तसे नाही. खरंतर ही जाहिरात आहे.  जी पुनीत मल्होत्रा ​​दिग्दर्शित करत आहे आणि धर्मा २.० च्या बॅनरखाली ती तयार केली जात आहे.

यापुर्वीही धोनीने करण जोहरसोबत एका बाईक जाहिरातीसाठी काम केलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित एमोटोराड इलेक्ट्रिक सायकल जाहिरातीत धोनी झळकला होता.  या जाहिरातीत धोनीने रणबीर कपूरचा 'ॲनिमल' सिनेमातील लूक केला होता. धोनी हा जाहिरातींमधून मोठी कमाई करतो.  क्रिकेटपासून दूर राहूनदेखील धोनी  करोडो रुपयांची कमाई करून दाखवतो. एमएस धोनीची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते. 

टॅग्स :करण जोहरमहेंद्रसिंग धोनीबॉलिवूड