Join us
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:38 IST

रीमा लागू आणि विवेक लागू यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये एकत्र काम केलं.

मराठी, हिंदी रंगभूमी, मालिका आणि सिनेमे गाजवणारी अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo). २०१७ सालीच त्यांचं निधन झालं. रीमा लागू यांच्या अभिनयाचे चाहते आजही त्यांची आठवण काढतात. त्यांचे पूर्व पती अभिनेते विवेक लागू यांनीही दोन दिवसांपूर्वी १९ जून रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांची एकुलती एक मुलगी मृण्मयी लागू (Mrunmayee Lagoo) सुद्धा अभिनेत्री आणि लेखिका आहे. आज आईच्या वाढदिवसानिमित्त तिने आईवडिलांचा गोड फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने भावुक कॅप्शन लिहिलं आहे.

रीमा लागू आणि विवेक लागू यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये एकत्र काम केलं. त्यांचा असाच एक जुना फोटो शेअर करत मृण्मयी लागू लिहिते, "दोघंही एकत्र काम करत होते तेव्हा खूप आनंदी होते. तेव्हा ते हसायचे, एकमेकांना चिडवायचे, समजूत घालायचे, भांडायचे आणि प्रेम करायचे. अतोनात प्रेम करणं हे आयुष्यात प्रत्येकाच्याच नशीबी आलेलं नाही. आज तिचा वाढदिवस आहे. तिने ८ वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला आणि अखेर तोही म्हणाला की, 'आता बास झालं! मला तिला भेटायला जायचं आहे.' आणि मग तो १९ जून रोजी गेला. त्याआधी काही दिवस तो स्वत:ला प्रेझेंटेबल ठेवत होता. तिच्यासाठी त्याला हँडसम दिसण्यात काहीही कमी पडू द्यायचं नव्हतं. मला आशा आहे तुम्ही दोघंही आज नेहमीसारखे एकत्र आहात. मला तुमच्या दोघांचीही आठवण येते. पण त्यापेक्षा तुम्हाला एकत्र पाहणं मी जास्त मिस करते. पण आता अखेर तुम्ही सोबत आहात हेच माझ्यासाठी समाधानकारक आहे."

१९७८ साली रीमा लागू आणि विवेक लागू यांनी लग्न केलं होतं. १९८८ साली रीमा यांनी मृण्मयीला जन्म दिला. त्याचवेळी त्यांचा विवेक यांच्यासोबत घटस्फोटही झाला. दोघांमध्ये मतभेद होते. मात्र घटस्फोटानंतर दोघांनीही पुन्हा लग्न केलं नाही. इतकंच नाही तर त्यांनी घटस्फोटानंतरही नाटकात एकत्र काम केलं होतं. रीमा यांचे तर हिंदी, मराठी सगळीकडेच चाहते आहेत. तर विवेक लागू हे रंगभूमीवरील अतिशय शिस्तप्रिय नट होते. शिवाय ते लेखक आणि संगीत दिग्दर्शकही होते. 

टॅग्स :रिमा लागूमराठी अभिनेता