Join us

'मिर्झापूर' फेम शाहनवाज प्रधान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:20 IST

Shahnawaz Pradhan : प्रसिद्ध अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रधान यांनी श्री कृष्णा, अलिफ लैला या लोकप्रिय मालिकांसह अनेक वेब सीरीज आणि चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

'मिर्झापूर' फेम शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मीडिया रिपोर्टनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शाहनवाज प्रधान यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता राजेश तैलंगने शोक व्यक्त करत लिहिले की, शाहनवाज भावा सलाम!! तू माणूस म्हणून किती चांगला होता आणि अभिनेता म्हणून काय दर्जाचा होता हे मी 'मिर्झापूर' या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान पाहिलं आहे. 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये शाहनवाज यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका केली होती. तर राजेश तैलंगदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. 

शाहनवाज प्रधान यांचा जन्म ६ डिसेंबर १९६३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सातवीत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना ते नाटकाच्या ग्रुपसोबत जोडले गेले. शाहनवाज यांनी १९९१ साली सिनेइंंडस्ट्रीत करियर करायचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. 

शाहनवाज प्रधान यांनी 'जन से जनतंत्र' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी 'श्री कृष्णा' या लोकप्रिय मालिकेत नंद बाबा ही भूमिका साकारली. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'देख भाई देख', 'अलिफ लैला', 'ब्योमकेश बख्शी', 'बंधन सात जन्मों का' या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच 'प्यार कोई खेल नहीं', 'फँटम' आणि 'रईस' सारख्या चित्रपटात ते झळकले आहेत. तसेच 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये त्यांनी गोलू आणि स्वीटीच्या वडिलांची भूमिका केली होती. त्यांची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज