Join us

माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; समीर-शेफालीचं जुळवून देण्यासाठी घेणार पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:22 IST

Mazi tuzi reshimgath: समीर आणि शेफाली ही जोडी आणखी जवळ यावी यासाठी एका नव्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. आतापर्यंत या मालिकेतील यश आणि नेहा या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. त्यांच्यातील उत्तम केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र, या जोडीसोबतच आणखी एक जोडी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे शेफाली आणि समीर. सध्या नेहा आणि यशसोबत या जोडीमध्येही प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ही जोडी आणखी जवळ यावी यासाठी एका नव्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

शेफाली आणि समीर या दोघांमध्येही हळूहळू प्रेमाचं नातं तयार होत आहे. मात्र, समीर हे नात्य मान्य करायला थोडा लाजत आहे. त्यामुळेच या मालिकेत शेफालीच्या आईची एन्ट्री होणार आहे. आता शेफालीची आईच तिचं आणि समीरच्या नात्याला नव्या वळणावर घेऊन जाणार आहे.या मालिकेत शेफालीच्या आईची भूमिका अभिनेत्री गौरी केंद्रे साकारणार आहे. मोहिनी असं त्यांच्या व्यक्तीरेखेचं नाव असून त्या विनोदी भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, "माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. या लोकप्रिय मालिकेत एका रंजक वळणावर मोहिनी या व्यक्तिरेखेची एंट्री होतेय. मी मोहिनी म्हणजेच शेफालीच्या आईची भूमिका साकारतेय जे एक हसमुख व्यक्तिमत्व आहे. मोहिनीमुळे प्रेक्षकांना मालिका पाहताना मजा येईल. ही मोहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल," असं गौरी केंद्रे म्हणाल्या.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे