Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठी अवॉर्डस सोहळ्यात 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील या अभिनेत्याच्या नृत्याला मिळाला वन्स मोअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 08:00 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील आनंद अर्थात अभिनेता मिहीर राजदाने अलीकडेच संपन्न झालेल्या 'झी मराठी अवॉर्ड्स २०१८' पुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स केला.

दिवाळीचा सण जवळ आला की, प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स नुकताच पार पडला. गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं, असं म्हणत जवळपास दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, स्वावलंबी राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी नखरेल शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला बिचारा गुरुनाथ या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. राधिका, गॅरी आणि शनाया याशिवाय मालिकेत बाकीच्या व्यक्तिरेखांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

या मालिकेतील आनंद अर्थात अभिनेता मिहीर राजदाने अलीकडेच संपन्न झालेल्या 'झी मराठी अवॉर्ड्स २०१८' पुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स केला. प्रेक्षक त्याच्या नृत्यावर इतके फिदा झाले की त्याला 'वन्स मोअर' मिळाला. मिहीरला यापूर्वी कधीही नाचताना न पाहिल्याने तो कसा नाचेल याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होती. पण तो इतका छान नाचला की, प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं. मालिकेतली जेनी अर्थात अभिनेत्री शर्मिला राजारामनंही त्याला छान साथ दिली. त्यांच्या नृत्याची चर्चा नंतरही रंगली होती. इतकंच नव्हे तर त्याच्या डान्स नंतर प्रेक्षकांनी 'वन्स मोअर'साठी एकच कल्ला केला. पण कार्यक्रमाची वेळ मर्यादित असल्यामुळे हा 'वन्समोअर' देण्यात नाही आला. आनंदचा हा दमदार परफॉर्मन्स प्रेक्षक झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये टीव्हीवर लवकरच पाहू शकतील. झी मराठी अवॉर्ड्स २०१८, २८ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.   

टॅग्स :झी मराठी अवॉर्ड्स २०१८झी मराठीमाझ्या नवऱ्याची बायको