Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंखे दिसणार हिंदी मालिका 'पुकार-दिल से दिल तक'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:19 IST

Sayali Salunkhe : अभिनेत्री सायली साळुंखे मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध मालिकेत काम केले आहे. दरम्यान आता ती सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री सायली साळुंखे मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध मालिकेत काम केले आहे. मराठीशिवाय तिने हिंदी मालिकेतही काम केले आहे. दरम्यान आता ती सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव आहे पुकार – दिल से दिल तक. या मालिकेत सायली वेदिका ही मुख्य भूमिका साकारणार आहे.

पुकार – दिल से दिल तक या मालिकेत वेदिका ही मुख्य भूमिका साकारण्यासाठी सायली साळुंखे या सुंदर अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. वेदिका एक आधुनिक तरुणी आहे- स्वतंत्र, सद्वर्तनी आणि करारी. भूतकाळातील अनुभवांमुळे कुणावर विश्वास टाकणे तिला अवघड जाते आणि ती नेहमी सावध असते. तिची व्यक्तिरेखा गुंतागुंतीची आहे. एक वकील असल्याने तिची बुद्धी बारीक विश्लेषण करणारी आहे, ज्यामुळे परिस्थितीचा ती कधीकधी जास्त गांभीर्याने विचार करते. संभाव्य धोक्यांचा ती बारकाईने विचार करते आणि अगदी वाईटात वाईट परिस्थितीसाठी ती स्वतःला सज्ज ठेवते.

 सायली साळुंखे म्हणते, “ही आकर्षक गोष्ट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेईल. मला जेव्हा ही कथा सांगण्यात आली, तेव्हा मी देखील त्यात हरवून गेले होते. एक आई आणि दोन मुलींची ही गोष्ट आहे, ज्यात अनेक वळणे, आडवळणे आहेत, भूतकाळातील अनेक रहस्ये या प्रवासात उलगडत जातील. त्यांच्यातील हरपलेले नाते त्यांना पुन्हा घट्ट करायचे आहे. हे कथानक प्रेक्षकांना नक्कीच भावेल. मी पहिल्यांदाच एका वकिलाची भूमिका करत आहे. वेदिकाची करडी न्यायबुद्धी मला माझ्याशी मिळतीजुळती वाटते. स्वतःचा आंतरिक लढा लढता लढता आपला वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांची सांगड ती कशी घालते, हे तिच्या प्रवासात बघण्यासारखे असेल. एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या छटा असलेल्या नवनवीन व्यक्तिरेखा साकारणे मला आव्हानात्मक वाटते. पडद्यावरील प्रत्येक क्षण हा आत्मचिंतनाचा आणि मोठे होण्याचा प्रवास असतो. आणि मला आशा आहे की, माझ्या या नवीन प्रवासात माझे चाहते मला साथ देतील.”