२०१४ साली परेश मोकाशी दिग्दर्शित 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपट (Elizabeth Ekadashi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटात अभिनेत्री नंदिता धुरीसोबत श्रीरंग महाजन, सायली भांडाकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हे बालकलाकारही प्रमुख भूमिकेत होते. श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायलीने मुक्ता म्हणजेच झेंडूची भूमिका साकारली होती. आपली सायकल वाचवण्यासाठी बालकलाकारांनी जो काही आटापिटा केला त्यातून घडणाऱ्या घडामोडीचे दर्शन या सिनेमात अतिशय सुरेखपणे दाखवण्यात आले आहे. 'गरम बांगड्या गरम बांगड्या' म्हणत बांगड्या विकणारी झेंडू या चित्रपटानंतर इंडस्ट्रीतून गायबच झालेली पाहायला मिळाली. ती कुठे आहे आणि काय करते याबद्दल आज जाणून घेऊयात…
एलिझाबेथ एकादशी सिनेमात झेंडूची भूमिका बालकलाकार सायली भांडारकवठेकर (Sayali Bhandarkavathekar) हिने निभावली होती. या चित्रपटानंतर ती चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. मात्र नंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसली नाही. सायली ही मूळची सोलापूरची आहे. पण आता ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली आहे. पुण्यातील एका कॉलेजमध्ये ती फिजिओथेरपी शिकते आहे. सध्या दुसऱ्या वर्षात असल्याने लवकरच तिची परीक्षा देखील होणार आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून फिजिओथेरपिस्ट बनायचे आहे.
सायली भांडाकवठेकर अलिकडेच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली. त्यात तिने एलिझाबेथ एकादशी चित्रपट रिलीज होऊन १० वर्षे उलटली आहेत. त्यामुळे तिच्या चेहऱ्यात आता खूप बदल झाल्याचे सांगितले. ती पुढे म्हणाली की, ''लवकरच माझी परीक्षा असल्यामुळे सध्या त्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आता डोक्यामध्ये फक्त विचार फिजिओथेरेपीमधून पदवी घेण्याबाबतचे आहे.'' यावरून लक्षात येते की सायलीचा पुन्हा सिनेमात काम करण्याचा सध्या तरी विचार दिसत नाही आहे.