झी गौरव 2017 पुरस्कारांची नामांकनं जाहीर,‘सैराट’,‘रंगा पतंगा’,‘कासव’मध्ये चुरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 17:43 IST
सिनेसृष्टीत मानाच्या समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार 2017 ची उत्सुकता सा-यांनाच आहे. 'झी गौरव'ची नामांकनं जाहीर झालीत. मराठी चित्रपट ...
झी गौरव 2017 पुरस्कारांची नामांकनं जाहीर,‘सैराट’,‘रंगा पतंगा’,‘कासव’मध्ये चुरस
सिनेसृष्टीत मानाच्या समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार 2017 ची उत्सुकता सा-यांनाच आहे. 'झी गौरव'ची नामांकनं जाहीर झालीत. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या वर्षभराच्या कामगिरीची दखल घेत त्यातील उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या आणि प्रेक्षकांसहित अवघ्या मनोरंजनसृष्टीचं लक्ष वेधून घेणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच राजेशाही थाटात पार पडला. यावर्षी आपल्या कामगिरीने राज्यातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सैराट चित्रपटाने सर्वाधिक अकरा नामांकने मिळवली आहेत. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ ने आठ आणि ‘हाफ तिकीट’ आणि ‘रंगा पतगा’ने सात विभागात नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. व्यावसायिक नाटकांमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’ने बारा विभांगात नामांकने मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे तर ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाने नऊ विभांगात तथा ‘कोडमंत्र’ आणि ‘तीन पायांची शर्यत’ नाटकाने प्रत्येकी सहा विभांगात नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘हे राम’ दहा नामांकने, ‘एम एच १२ जे १६’ आणि ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाने प्रत्येकी सात नामांकने मिळवली आहेत. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच असते.या पुरस्कारांत कोण किती नामांकने मिळवतो? आणि त्यात कोण बाजी मारतो? याबाबत प्रेक्षक आणि मनोरंजनसृष्टीही उत्सुक असते.दरवर्षी एखादी विशिष्ट संकल्पना घेऊन झी गौरव पुरस्कार नामांकन सोहळा आणि पुरस्कार सोहळाही थाटामाटात रंगतो. मराठी मनोरंजनाचं साम्राज्य अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या झी गौरव पुरस्काराचा नामांकन सोहळाही राजेशाही थाटात पार पडला.मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत देखण्या राजेशाही अंदाजात या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.या सर्व कलाकारांच्या मांदियाळीत नामांकने घोषीत करण्यात आली.मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष लक्षवेधी ठरलं ते ‘सैराट’च्या विक्रमी कामगिरीमुळे. मराठी चित्रपटसुद्धा शंभर कोटींचं स्वप्न बघू शकतो हा विश्वास सैराटने निर्माण केला. अजय-अतुलच्या संगीताची जादू आणि आर्ची-परश्याच्या प्रेमकथेने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. सैराटची ही जादू झी गौरवच्या नामांकनातही बघायला मिळाली. सैराटने उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री, उत्कृष्ट संगीतासहित अनेक महत्त्वाच्या विभागांत नामांकने मिळवली. आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींच्या ‘कासव’नेही परीक्षकांचे लक्ष वेधत आठ नामांकने मिळवली आहेत. शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या संवेदनशिल ‘रंगा पतंगा’नेही सात नामांकने मिळवली आहेत. पुष्कर श्रोत्री या लोकप्रिय अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘उबंटु’ चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटासह इतरही महत्त्वाच्या विभागात नामांकने मिळवली आहेत. सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेल्या आणि यावर्षी प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ने परीक्षकांचीही मने जिंकत बारा विभागांत नामांकने मिळवली आहेत.महेश एलकुंचवार यांच्या लेखणीने आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकानेही नऊ विभागांत नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे.यावर्षीच्या झी चित्र गौरव पुरस्कारासाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि किरण यज्ञोपावित यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात सुरेश खरे, विजय तापस आणि रविंद्र दिवेकर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी नितिन नेरुरकर, राजन ताम्हाणे आणि योगेश सोमण यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.