Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तुम्हाला माहितीये का, तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर यांनी बिग बीं सोबत केले आहे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 11:44 IST

ये रे ये रे पैसा च्या टीमने अमिताभ बच्चन यांची नुकतीच भेट घेतली आणि चित्रपटाच्या स्टारकास्टने बिग बीं सोबत ...

ये रे ये रे पैसा च्या टीमने अमिताभ बच्चन यांची नुकतीच भेट घेतली आणि चित्रपटाच्या स्टारकास्टने बिग बीं सोबत क्वालिटी टाइम घालवला. या भेटीत ये रे ये रे पैसाची बबली म्हणजेच तेजस्विनी पंडित बिग बींना दाखवायला एक खास वस्तू घेऊन गेली होती.तेजस्विनी पंडितने आपल्या आईचा एक व्हिडिओ बिग बींना दाखवला. हा व्हिडिओ खूपच खास होता. कारण या व्हिडिओमध्ये तेजस्विनीच्या आईसोबत म्हणजे ज्योती चांदेकरांसोबत खुद्द अमिताभ बच्चन होते. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या बी आर इशारा दिग्दर्शित 'एक नजर' या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती आणि त्या वेळेस त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. तेजस्विनी पंडितने बिग बींसोबतच्या या भेटीत बिग बींना एक नजर या चित्रपटातली एक व्हिडिओ क्लिप दाखवली, ज्यात ज्योती चांदेकर आणि अमिताभ बच्चन यांचे संभाषण असलेले दृश्य होते. ही व्हिडिओ क्लिप स्वतः ज्योती चांदेकर यांनी आपल्या सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. स्वतःच्या आईचा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांना दाखवणे आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणे, हे तेजस्विनीसाठी खूप खास होते. ती सांगते, ''मी हे फार आधी प्लान केले होते की, जेव्हा मी अमिताभजींना भेटेन. तेव्हा मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडिओ नक्कीच दाखवणार. माझ्या आईची पण ही इच्छा होती. पण त्यांना भेटायला जाताना मी थोडी नर्व्हस होते. बिग बींकडे एवढा वेळ असेल का? इतके मोठे कलाकार किती लोक त्यांना भेटत असतील. माझा हा व्हिडिओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल असे अनेक प्रश्न मला पडले होते. म्हणून मी तिथे पोचल्यावर 'ये रे ये रे पैसा' बाबतची चर्चा करून झाल्यावर त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांना हा व्हिडिओ दाखवला. माझ्या आईसोबत त्यांनी एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचे नाव आठवत नव्हते. पण हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद म्हटले. ते खूपच खूश झाले होते. मी त्यांना हेही सांगितलं की, माझे बाबा तुमचे फार मोठे फॅन होते. जेव्हा कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस तुमचा अपघात झाला होता, तेव्हा माझ्या बाबांनी सिद्धिविनायकाकडे नवस मागितला होता आणि तुम्ही बरे झालात तेव्हा बाबा चालत सिद्धिविनायकाला गेले होते आणि सोन्याच्या दुर्वा गणपतीला अर्पण केल्या होत्या. आमची तेव्हा सोन्याच्या दुर्वा घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती देखील नव्हती. पण बाबा तुमचे खरेच फार मोठे फॅन होते. हे सगळे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना फार कौतुक आणि समाधान वाटलं." Also Read : १०४ डिग्री तापात देखील तेजस्विनीने केले ये रे ये रे पैसाचे शूटींग