Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘यलो’गर्लची प्रेरणादायी कामगिरी, गौरी झाली ग्रॅज्युएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 12:57 IST

‘यलो’ सिनेमात आपल्या अभिनयाने सा-यांची मने जिंकणारी आणि याच अभिनय गुणांसाठी राष्ट्रीय पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळवणारी गौरी गाडगीळ. ...

‘यलो’ सिनेमात आपल्या अभिनयाने सा-यांची मने जिंकणारी आणि याच अभिनय गुणांसाठी राष्ट्रीय पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळवणारी गौरी गाडगीळ. स्पेशल चाइल्ड असलेल्या गौरीचं महाराष्ट्रातल्या नाहीच तर देशविदेशातल्या तमाम रसिकांनी कौतुक केलं. आता याच गौरीनं आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय. शिक्षणाची ओढ असणा-या गौरीने पदवी मिळवली आहे. कला आणि समाजशास्त्र या विषयात गौरीनं पदवी मिळवली आहे. गौरीने पदवी मिळवल्याची शुभवार्ता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी रसिकांना दिलीय. फेसबुकवर याबाबत त्यांनी पोस्ट टाकून गौरीचं कौतुक केलं आहे.“आपली गौरी गाडगीळ आता ग्रॅज्युएट झाली आहे. कला आणि समाजशास्त्र विषय घेऊन तिने ही पदवी मिळवली आहे. खरंच खूप खूप अभिमान वाटतोय. गौरी आणि तिची रियल आयुष्यातील आई स्नेहा हे खरे हिरो आहे. यांत तिच्या वडिलांचे आणि धाकट्या बहिणीचंही योगदान कुणीही विसरु शकत नाही. खरंच खूप खूप ग्रेट कुटुंब. गाडगीळ कुटुंबाचं मनापासून खूप खूप अभिनंदन” अशी पोस्ट फेसबुकवर टाकून मृणाल कुलकर्णी यांनी रसिकांना खुशखबर दिली आहे.या पोस्टनंतर गौरीवर सोशल मीडियावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षावर होत आहे. 'यलो' सिनेमातील भूमिकेनंतर रसिकांनी गौरीचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. याशिवाय मृणाल कुलकर्णी, हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, अमोल गुप्ते, मधुर भांडारकर आणि सलमान खानसह दिग्गज कलाकारांनीही गौरीच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तिच्या अभिनय गुणावर खरी मोहर उमटवली ती राष्ट्रीय पुरस्काराने. अभिनय, शिक्षणासह पॅरा ऑलिम्पिकमध्येही गौरीने भारताचे नाव उंचावलं आहे. भारताचे चीनच्या बीजिंगमध्ये झालेल्या या पॅरा ऑलिम्पिकमध्ये तिने नेतृत्व करत रौप्य पदक मिळवले होते. आता शिक्षणात पदवी मिळवून तिने आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय. भविष्यात तिला स्विमिंग कोच व्हायचे आहे. मात्र सध्या पदवी मिळवून सा-यांसमोर अनोखा आदर्श निर्माण गौरीवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. लोकमत सीएनएक्स मस्तीकडूनही गौरीचं विशेष अभिनंदन आणि तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...