आपल्याकडे बाइक असावी असे प्रत्येक तरूणाचे स्वप्न असते. आपल्या स्वप्नातील बाइक एकदा हातात आली की, प्रत्येकाचा आनंद गगनात मावतो. अगदी असेच स्वप्न अभिनेता सुव्रत जोशीचे देखील पूर्ण झाले आहे. त्याचे हे बाईकचे स्वप्न कॉलेज लाईफमध्ये नाही तर आता अभिनेता झाल्यानंतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो सध्या सातवे आसमानपर आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे, ते त्याच्या पहिल्या चित्रपटामुळे. त्याच्या या ड्रीम बाइकवरून तो पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जात असे. यापूर्वी सुव्रतने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील त्याची सुजय म्हणजेच स्कॉलरची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. या मालिकेनंतर आता तो अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या प्रयोगात व्यग्र आहे. हा प्रवास पाहता सुव्रतची गाडी सुसाट सुटली आहे असेच म्हणावे लागेल. त्याच्या या सुंदर स्वप्नांचा पाठलाग तो त्याच्या ड्रीम बाइकवरून करत असल्यामुळे त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचा हा आनंद त्याने सोशल मीडियावर व्यक्त केलाय. सुव्रतने त्याच्या ड्रीम बाइकवरचा एक झक्कास फोटोदेखील सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आपल्या ड्रीम बाइक राईडचा सुंदर क्षणदेखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या झक्कास फोटोचे श्रेय त्याने लौकिक जोशीला दिले आहे. सुव्रत पहिल्या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत झळकणार आहे. या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘पाइपलाईन’ असल्याचे समजतेय. चला तर पाहूयात सुव्रत आणि प्राजक्ताची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते का?
का आहे सुव्रत जोशी आनंदात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:59 IST