Join us

"फ्रीमध्ये दिसलो तर ३०० रुपयांचं तिकिट काढून कोण येणार?", प्रसाद ओकच्या विधानानंतर पार्थ भालेराव स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:46 IST

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक(Prasad Oak)ने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोममध्ये रिलस्टारवर वक्तव्य केले होते, जे चर्चेत आले होते. त्यानंतर आता अभिनेता पार्थ भालेरावने रिल्स आणि मालिकेच्या माध्यमातून फ्रीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.    

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक(Prasad Oak)ने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोममध्ये रिलस्टारवर वक्तव्य केले होते, जे चर्चेत आले होते. रिल्स करुन आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना ज्यांना वाटायला लागलंय, हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. ज्यांच्या रील्सला काही हजार, मिलियन, बिलियन व्ह्यूज आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांचं नाटक बघायला १० माणसंही येत नाहीत हे तथ्य आहे, असे प्रसाद ओकने म्हटले होते. त्यानंतर आता अभिनेता पार्थ भालेराव(Parth Bhalerao)ने रिल्स आणि मालिकेच्या माध्यमातून फ्रीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.    

अभिनेता पार्थ भालेरावने आरजे सोनालीला दिलेल्या मुलाखतीत रिल्स आणि मालिकेत काम करणाऱ्याबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, "या टीव्ही आणि रिल्समुळे असं होतं की मी वारंवार लोकांसमोर येत राहणार. ते ही फ्रीमध्ये. त्यामुळे मी टीव्हीवर फारसा दिसत नाही आणि रिल्स कधी बनवतही नाही, काही ठराविक गोष्टीच मी सोशल मीडियावर टाकतो. दररोजच्या मालिका आणि रिल्समुळे मी त्यांना फ्रिमध्ये दिसणार अशावेळी ३०० रुपये तिकीट काढून त्यांना थिएटरपर्यंत बोलवणं अवघड होऊन बसतं. हे ऐकताना पचन होत नसेल पण याची बरीच उदाहरणं आहेत." 

"एखादा कलाकार कधीतरी येतो तेव्हा..."

तो पुढे म्हणाला की, "आताचाच एक मोठा सिनेमा हा खूप जोरात आपटला, ज्याचं कास्टिंगच फॉलोअर्स आणि सोशल नंबरवर आधारीत होतं. त्याआधीही असाच एक प्रयत्न झाला होता. अशी अनेक उदाहरणं आहेत. १० वर्षांपूर्वी टीव्हीवर काम करणाऱ्या कलाकारांचा एक चित्रपट आला तोही वर्कआउट झाला नाही. यामागची प्रेक्षकांची मानसिकता अशी आहे की, ज्यांना मी रोज टीव्हीवर बघतोय त्यांच्यासाठी ३०० रुपयांचं तिकीट काढून जाणं हे अवघड होऊन बसतं. एखादा कलाकार कधीतरी येतो तेव्हा मी पैसे काढून जाईन बघायला असं त्यांचं मत असतं."

टॅग्स :प्रसाद ओक