रजनीकांत यांच्यासह झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री!कोण आहे ती अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 15:22 IST
'थलायवा' आणि दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमात काम मिळावं, त्यांच्यासह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा ...
रजनीकांत यांच्यासह झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री!कोण आहे ती अभिनेत्री?
'थलायवा' आणि दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमात काम मिळावं, त्यांच्यासह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मात्र सुपरस्टार रजनीसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलावंतानाच मिळते. अशीच संधी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अंजली पाटील. मूळची नाशिकची असलेली अंजली लवकरच रजनीकांत यांच्यासह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रजनीकांत यांच्या आगामी 'काला कारिकालन' या सिनेमात अंजली झळकणार आहे. खुद्द अंजलीनं ट्विटरवरुन ही गुड न्यूज रसिकांसह शेअर केली आहे. काला कारिकालन हा रजनीकांत यांचा आगामी तमिळ सिनेमा असून त्यांचा जावई धनुष या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तर कबाली फेम प.रणजिथ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाबाबत अंजली भलतीच एक्साईटेड आहे. रजनीकांत यांच्यासह काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यांचं या सिनेमात असणं आणि त्यांच्यासोबत कामाची संधी हेच या सिनेमात काम करण्याचं प्रमुख कारण असल्याचं अंजलीनं सांगितलं आहे. याशिवाय दिग्दर्शक रणजित यांच्याशी लवकरच चांगला संवाद आणि ट्युगिंन झाल्यानं सिनेमाला होकार दिला. त्यासाठी चेन्नईला जावं लागल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या सिनेमात काम करत असून सध्या शुटिंग सुरु आहे. जूनमध्ये हे शुटिंग संपल्यानंतर काला कारिकालन सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होईल अशी माहितीही अंजलीनं दिली आहे. पुढील काही महिने आपल्यासाठी अधिक कामाचे आणि तणावाचे असले तरी त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे अंजलीनं सांगितले आहे. रजनीकांत यांच्यासह काम करण्यासोबतच सिनेमातील भूमिकाही विशेष लक्षवेधी असल्याने सिनेमाबाबत बरीच उत्सुकता असल्याचे सांगायलाही ती विसरली नाही. अंजली पाटील पहिल्यांदाच दक्षिणेच्या सिनेमात काम करते असं नाही. याआधीही तिने दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. दिल्ली इन ए डे, चक्रव्यूह या सिनेमातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झालं. तसंच श्रीलंकन सिनेमा विथ यू विदाऊट यू या सिनेमासाठी तिला गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सिल्वहर पीकॉक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही अंजलीला गौरवण्यात आलं आहे. तेलुगू सिनेमा ना बांगारु टल्ली सिनेमातील भूमिकेसाठी स्पेशल मेन्शन पुरस्काराने तिला गौरवण्यात आले होते. दीपिका पादुकोण स्टार फाईंडिंग फॅनी या सिनेमातही तिची लक्षवेधी भूमिका होती. मराठी सिनेमातही अंजलीने काम केले आहे. तिनं काम केलेल्या सायलन्स या सिनेमाचं बरंच कौतुक झालं. विविध चित्रपट महोत्सवात सायलन्सचं कौतुक झालं. लवकरच बर्दो या सिनेमातून ती मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होणार असून यांत अंजलीसह मकरंद देशपांडे, अशोक समर्थ यांच्या भूमिका आहेत.