Join us
Daily Top 2Weekly Top 5

नट झालो नाही हे बरं झालं, एका टॉक शोमध्ये केदार शिंदेनी दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 08:00 IST

आज जे काही करू शकलो, तेवढं नट होऊनही करू शकला नसतो” अशा शब्दात केदार यांनी स्वतःशीच गप्पा मारल्या होत्या.

झगमगत्या आणि चमचमत्या चित्रपटसृष्टीत अभिनेता किंवा अभिनेत्री बनून पडद्यावर झळकावं असं अनेकांचं स्वप्न असतं. नट बनून रुपेरी पडद्यावर छाप पाडावी आणि स्वतःची वेगळी ओळख बनवावी असंही अनेकांचं ध्येय असतं. हेच स्वप्न कधीकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं. उत्तम डान्सर असलेल्या केदार शिंदे यांचंही महाविद्यालयीन दिवसात नट बनण्याचं स्वप्न होतं. आज मात्र नट झालो नाही हे बरं झालं आणि आयुष्यात कधीही नट बनण्याची इच्छाही नाही अशी कबूली खुद्द केदार शिंदे यांनीच एका कार्यक्रमात दिली होती.

काही वर्षापूर्वी  एका टॉक शोमध्ये केदार शिंदे यांनी ही मनमोकळी कबूली दिली होती.  या शोच्या फॉर्मटनुसार सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीला आरशासमोर उभं राहून स्वतःशी गप्पा माराव्या लागतात. या पद्धतीने आरशासमोर उभं राहून गप्पा मारताना केदार यांनी स्वतःचे आभार मानले होते. “लेखक, दिग्दर्शक, निर्माता होशील असं कधीच वाटलं नव्हतं, मात्र जिद्द, मेहनत, चिकाटीमुळे यश मिळालं. शाहीर साबळेंचा नातू म्हणून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर केदार शिंदे म्हणून स्वत:चं अस्तित्व निर्माण करू शकलास. तुला धन्यवाद म्हणायचंय. 

महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तू लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करत होतास. तेव्हा नट होण्याचं खूळसुद्धा डोक्यात होतं. त्यावेळी असाच आरशात उभा राहून चांगला नट होऊ शकतो का असा प्रश्न विचारला. तेव्हा मला खरं उत्तर दिलंस. तू याच क्षेत्रात राहा, नट होऊ नकोस असं मला सांगितलंस. त्यावेळी मला तुझा रागसुद्धा आला होता. मात्र आज जे काही करू शकलो, तेवढं नट होऊनही करू शकला नसतो” अशा शब्दात केदार यांनी स्वतःशीच गप्पा मारल्या होत्या. 

सोशल मीडियावर संवाद साधताना, तिथल्या फॉलोअर्सची संख्या किंवा अनेकांशी संवाद साधतानाही नट झालो नाही ते बरं झालं असं वाटतं अशी प्रांजळ कबुलीही केदार शिंदे यांनी दिली होती. 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'गलगले निघाले', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'इरादा पक्का' अशा विविध मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 

याशिवाय रंगभूमीवरही केदार यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. याशिवाय 'हसा चकट फू', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलंय बिघडलंय' या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :केदार शिंदे