Join us

'हा संघर्ष सार्थकी लागल्याचं साक्षीदार झालो'; तेजस्विनी पंडितची आईसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:04 IST

Tejaswini Pandit: नुकतीच तेजस्विनीने आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे. ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अभिनयाचे हे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळाले आहे. मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित या तेजस्विनीच्या आई आहेत. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातून दोघी माय लेकीने सिंधुताईंची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. नुकतीच तेजस्विनीने आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

ज्योती चांदेकर यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने नुकतेच बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या आईचा झालेल्या या सत्कार सोहळ्यानिमित्त तेजस्विनीने एक स्पेशल पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने' ज्योती चांदेकर (आईला) गौरवण्यात आले. ५० वर्षाची कारकीर्द! अत्यंत कष्टाने साधलेला दीर्घ कला प्रवास. आईच्या व्यग्र शेड्युलमुळे तिचा सहवास आम्हाला मुली म्हणून खूप उशीरा मिळाला, आईच्या हाताची चव आम्ही पहिल्यांदा वयाच्या १६व्या वर्षी चाखली...अश्या "आई सोबत असण्याचे" अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत. पण ह्याची अजिबात तक्रार नाही...कारण आमची आई आमचं घर संभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन , अनेक बलिदानं देऊन स्वतःचं अस्तित्व घडवत होती! आणि आज तिला हा मानाचा पुरस्कार स्विकारताना बघून हा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो.

तिने पुढे म्हटले की,  बाबा असता तर आईला हा पुरस्कार स्विकारताना तिचा आनंद द्विगुणित झाला असता ! कारण तिच्या ह्या यशामध्ये त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीलया पेलली... आईच्या डोळ्यात समाधानाचे ,आनंदाचे अश्रू बघून तिचा वारसा मी पुढे चालवते आहे, त्याची जबाबदारी कळत नकळत खूप मोठी आहे आणि ती माझ्यावर आहे ह्याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच अत्यंत उत्तुंग कलाकाराची मी लेक आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. अभिनंदन आई आणि धन्यवाद बालगंधर्व परिवार !

टॅग्स :तेजस्विनी पंडित