बापजन्म या चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत ऑफिसला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 13:54 IST
बापजन्म या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे सचिन खेडेकर, सत्यजित पटवर्धन, पुष्कराज ...
बापजन्म या चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत ऑफिसला भेट
बापजन्म या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे सचिन खेडेकर, सत्यजित पटवर्धन, पुष्कराज चिरपुटकर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी लोकमतच्या ऑफिसमध्ये येऊन खूप साऱ्या गप्पा मारल्या.बापजन्म या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी भास्कर पंडित ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी ते सांगतात, या चित्रपटात प्रेक्षकांना एका महत्त्वाकांक्षी माणसाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. करिअरच्या मागे धावताना त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे त्याचे कुटुंब त्याच्यापासून दुरावले जाते. त्याला आयुष्याच्या एका वळणावर येऊन त्याची ही चूक लक्षात येते आणि तो हरवलेल्या नात्यांचा शोध घेऊ लागतो. मला या चित्रपटाची कथा खूपच आवडली. निपुणसारख्या तरुण दिग्दर्शकाचा एक नवी कथा मांडण्याचा दृष्टिकोन मला भावला. या चित्रपटाची कथा बदललेल्या काळातील कुटुंबांची खरी गोष्ट असल्याने तरुणांना ही कथा आपलीशी वाटेल असे मला वाटते. या चित्रपटात सत्यजित पटवर्धन विक्रम ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेविषयी सत्यजित सांगतो, विक्रम हा परदेशात राहणारा आहे. तो त्याच्या आयुष्यात कोणत्यातरी गोष्टींने दुखावलेला आहे. त्यामुळे वडिलांशी संपर्क ठेवायचा नाही असे त्याने ठरवले आहे. पण कालांतराने त्याचे हृदयपरिवर्तन होते. पुष्कराज चिरपुटकर पहिल्यांदाच सचिन खेडेकर यांच्याबरोबर काम करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे तो सांगतो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी तो सांगतो, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सचिन खेडेकर यांनी खूपच फ्रेंडली वातावरण आम्हाला दिले. या चित्रपटातील माझी भूमिका सचिन सरांच्या मदतनीसाची असल्याने त्यांच्यासोबत मी अनेक दृश्य चित्रीत केले आहेत. मला त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली.बापजन्म या चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आहेत. ते या चित्रपटाविषयी सांगतात, बापजन्म या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच या चित्रपटात एका बापाचा बाप म्हणून झालेला पुनर्जन्म प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपट दिग्दर्शित करण्याची ही माझी पहिलीच वेळ असली तरी मला दिग्दर्शनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. मला या चित्रपटात मनापासून सुचलेली कथा तशीच्या तशी कागदावर आणि पडद्यावर उतरवायची होती, तेच मी केले. या चित्रपटात मला पहिल्यापासून सचिन खेडेकरच बापाच्या भूमिकेत हवे होते. त्यामुळे त्यांना मी या भूमिकेसाठी विचारले आणि त्यांनी देखील या चित्रपटासाठी होकार दिला.सध्या मराठी चित्रपट खूप बदलत आहे. सध्या चित्रपटांची कथा खूपच वेगळी असते. तसेच मार्केटिंगदेखील खूप वेगळ्या पद्धतीने केले जाते. यावर सचिन खेडेकर सांगतात, आपल्याकडील प्रेक्षकांना एन्टरटेनमेंटसाठी हिंदी चित्रपट पाहायला आवडतात. पण आशयघन कथेसाठी ते मराठी चित्रपटांचीच निवड करतात. पण असे असले तरी चित्रपटांचे मार्केटिंग ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसे होत नाहीये. अनेकवेळा चित्रपटाविषयी लोकांना माहिती असते. सोशल मीडियावर प्रतिसादही उत्तम मिळतो. पण तिकीट काढून फार कमी लोक कुटुंबियांसमवेत चित्रपटगृहांमध्ये येतात ही शोकांतिका आहे.Also Read : ‘बापजन्म’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित