विजय कदम यांच्या ‘खुमखुमी’ ने जिंकली दाक्षिणात्य रसिकांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 12:09 IST
आपल्या सहजसुंदर विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय कलाकार विजय कदम गुढीपाडव्याचे औचित्य साधत ‘खुमखुमी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने चेन्नईला मराठी ...
विजय कदम यांच्या ‘खुमखुमी’ ने जिंकली दाक्षिणात्य रसिकांची मनं
आपल्या सहजसुंदर विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय कलाकार विजय कदम गुढीपाडव्याचे औचित्य साधत ‘खुमखुमी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने चेन्नईला मराठी रसिकांच्या भेटीस पोहोचले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने चेन्नई येथील मराठी मंडळाने ‘खुमखुमी’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निखळ हास्याची मेजवानी देणाऱ्या विजय कदम यांच्या आगळ्या वेगळ्या ‘खुमखुमी’ ला चेन्नईतल्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.चेन्नईतील भरगच्च सभागृहात मराठी रसिकजनांनी या रंगतदार मराठमोळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही यावेळी पार पडला. नवचैतन्याची गुढी उभारत सुरु झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला.श्रीखंड पुरीच्या लज्जतदार मराठी मेजवानीने कार्यक्रमाची सांगता झाली.‘खुमखुमी’ कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चेन्नईतील मराठी मंडळ उत्साहाने सहभागी झाले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार फडके, आशुतोष आपटे, चेन्नईच्या मराठी मंडळाचे अध्यक्ष समीर गद्रे यांचे बहुमोलाचे सहकार्य मिळाले.आगामी काळातही वेगळ्या उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमाचा मानस बोलून दाखवतानाच महाराष्ट्रातील कलाकार व प्रायोजकांना www. mmchennai.in येथे संपर्क साधण्याचे आवाहन चेन्नई मराठी मंडळाचे अध्यक्ष समीर गद्रे यांनी केले आहे.अभिनेते विजय कदम गेली काही वर्षं सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा' चे प्रयोग करत आहेत. या लोकनाट्याचे १९८६ पासून आतापर्यंत विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले आहेत. विजय कदम यांच्या 'विच्छा माझी पुरी करा' ला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. विजय कदम यांच्या अभिनयाने या नाटकाला चार चाँद लावले आहेत. विजय कदम यांच्यासह प्रियांका शेट्टी, मंगेश हाटले, चेतन म्हस्के, तुषार खेडेकर, संजय परब हे सहकलाकार देखील 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकात आहेत. दीप वझे आणि शशांक पडवळ वादक सहकलाकार आहेत. दिग्दर्शकाची जबाबदारी स्वतः विजय कदम यांनी सांभाळली असून सूत्रधार गोट्या सावंत आहेत. विजय कदम यांनी केलेल्या दिग्दर्शनाचे देखील लोक भरभरून कौतुक करतात.राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.