Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 15:38 IST

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या गेल्या आठ-दहा दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर आज रात्री अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळतेय. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. उमा भेंडे यांनी आम्ही जातो आमुच्या गावा, भालू, आपण यांना पाहिलंत का यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्या खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच चांगल्या नर्तिका होत्या. त्यांनी कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या आई या प्रभात कंपनीत कामाला होत्या तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर यांच्या कंपनीत होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अभिनयक्षेत्राविषयी आकर्षण होते. रंगभूमीवरून त्यांच्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली. भालाजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी सीतेच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अंतरीचा दिवा, थोरातांची कमळा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मधुचंद्र, अंगाई, काका मला वाचवा हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. अशी ही साताऱ्याची तऱ्हा या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात त्यांनी प्रकाश भेंडे यांच्यासोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे आणि प्रकाश भेंडे यांचे सूत जुळले आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न केले. लग्नानंतरही उमा भेंडे यांनी चित्रपटात काम करणे सुरूच ठेवले. अभिनय क्षेत्रात मिळालेल्या यशानंतर त्या निर्मितीकडे वळल्या. त्यांनी आणि प्रकाश भेंडे यांनी मिळून श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू केली होती. भालू, आपण यांना पाहिलंत का यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांच्या श्री प्रसाद चित्र या संस्थे मार्फत करण्यात आली होती. उमा भेंडे या उतारवयात अभिनयापासून दूरच राहिल्या होत्या. पण त्या प्रकाश भेंडे यांच्यासोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत असत. त्यांच्या पश्चत्यात पती प्रकाश भेंडे आणि मुले आहेत. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहेत.