Join us

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 19:32 IST

Suhasini Deshpande : मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. त्यांनी मराठीसोबतच हिंदीतही काम केले आहे.

मराठी कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसोबतच हिंदीतही काम केले आहे.

सुहासिनी देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले होते. मनाचा कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शप्पथ..! (२००६), चिरंजीव (२०१६) आणि धोंडी (२०१७) या चित्रपटात काम केले. त्या २०११ साली रिलीज झालेल्या सिंघम चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं यांसारख्या नाटकात भूमिका बजावल्या. रंगभूमीवरील कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे  जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.