Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सीमा देव यांनी केलं होतं अभिनयाच्या जगात पदार्पण, आईचा होता या निर्णयाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:25 IST

मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. वयाच्या ८१ वर्षी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनयक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणा-या सीमा देव या अल्झायमरसारख्या जटील आजाराने  ग्रस्त होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. 

सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी ही माहिती काही वर्षांपूर्वी स्वत: दिली होती. अल्झायमर हा प्रामुख्याने वार्धक्यामध्ये होणारा आजार आहे. सोप्या भाषेत स्मृतीभ्रंश वा विसरभोळेपणा असा याचा अर्थ होतो. या आजाराच्या रूग्णाच्या  विपरित परिणाम होऊन हळूहळू पूर्ण स्मृतिभ्रंश होतो. अगदी आपल्या जवळच्या लोकांचे नाव विसरण्यापासून जेवण खाणे विसरणे इथपर्यंत हा आजार बळावतो.

 सीमा देव यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमातही यादगार भूमिका साकारल्या होत्या. ‘जगाच्या पाठीवर’ या सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर घरखर्चाला हातभार म्हणून सीमा या बॅले आर्टिस्ट म्हणून काम करत. एकदा सुरेश फाळके त्यांचा बॅले शो बघायला गेलेत. याचठिकाणी त्यांनी सीमा यांना सिनेमात काम करशील का म्हणून विचारले.

सीमा यांच्या आईचा मुलीने चित्रपटात काम करण्यास विरोध होता. मात्र सीमा यांनी त्यांचे मन वळवले. प्रत्येक कामाच्या ठिकाणी मी सोबत येईन, या अटीवर आईने सीमा यांना चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली. यानंतर वयाच्या अवघ्या 15 वर्षी सीमा यांचा अभिनय जगातीस प्रवास सुरु झाला.  सुवासिनी, आनंद अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 1 जुलै 1963 रोजी सीमा व रमेश देव यांचा विवाह झाला होता.  

टॅग्स :अजिंक्य देव