Madhav Vaze Death: 'श्यामची आई' सिनेमात श्यामची भूमिका साकारुन सर्वांचं मन जिंकणारे ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन झालं आहे. माधव वझे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रीय होते. माधव वझे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेते काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना, सर्वांच्या मनात आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी माधव वझे (madhav vaze) यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
माधव वझे यांची श्यामची आई सिनेमातील भूमिका गाजली
माधव वझे यांनी 'श्यामची आई' सिनेमात साकारलेली श्यामची भूमिका खूप गाजली. १९५३ साली आलेल्या सिनेमातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. पुढे त्यांनी २००९ साली आलेल्या '३ इडियट्स' सिनेमा काम केलं. जॉय लोबोच्या बाबांची भूमिका माधव वझे यांनी साकारली होती. माधव वझे हे गेल्या काही वर्षांपासून रंगभूमीवरही कार्यरत होते.
माधव वझे यांची कारकीर्द२१ ऑक्टोबर १९३९ रोजी माधव वझे यांचा जन्म झाला. त्यांनी अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवली असली तरीही ते लेखक आणि दिग्दर्शकही होते. पुण्यातील नौरोसजी वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम केलंय. २०१३ साली त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट या मराठी नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. माधव वझे यांनी 'श्यामची आई', 'वहिनीच्या बांगड्या', '३ इडियट्स', 'डिअर जिंदगी', 'छप्पड फाड के' अशा अनेक हिंदी-मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. माधव यांच्या निधनाने लाडका श्याम काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे