वर्षा उसगांवकर दिसणार जळू या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 19:27 IST
वर्षा उसगांवकरने काही दिवसांपूर्वी जमाई राजा या मालिकेत काम केले होते. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या ...
वर्षा उसगांवकर दिसणार जळू या चित्रपटात
वर्षा उसगांवकरने काही दिवसांपूर्वी जमाई राजा या मालिकेत काम केले होते. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेद्वारे वर्षा कित्येक वर्षांनंतर हिंदी मालिकेत दिसली.वर्षा ही मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तिच्या कारकिर्दीत शेजारी शेजारी, गंमत जंमत, सवत माझी लाडकी, लपंडाव यांसारख्या मराठी चित्रपटात तर हफ्ता बंद, तिरंगा यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. आता वर्षा पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला. या मुहुर्ताच्यावेळी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. जळू या चित्रपटाची कथा स्त्रीच्या आयुष्याच्या अवतीभवती फिरणारी आहे. आजची स्त्री घर सांभाळून तिचे करियरदेखील तितक्याच चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. ती कोणत्याच क्षेत्रात आज मागे राहिलेली नाहीये. आज स्त्री सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली तरी आजही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये काहीही कमी झालेली नाहीये. आजही स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक शोषण यांसारख्या गोष्टी घडतच आहेत. या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा आणि स्त्रियांना त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य, अधिकार, महत्त्वकांक्षा यांची जाणीव करून देणारा जळू हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते अजितकुमार धुळे असून या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनदेखील त्यांचेच आहे. तसेच त्यांच्यासोबत निखिल भोसले या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. निखिल यांनी सीआयडी, आहट, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचे संकलन केले आहे. या चित्रपटातील गीतांना अमितराज यांनी संगीत दिले असून फुलवा खामकर नृत्यदिग्दर्शन करणार आहे.