Join us

‘चरणदास चोर’ मधून उलगडणार जगण्याचे विविध आयाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:18 IST

खजिना म्हटलं की, आपल्या डोळयांसमोर भरपूर पैसा, दागदागिने, सोने-नाणे असं काहीसं येतं. पण, हा खजिना प्राप्त करण्याच्या प्रवासात आपल्याला ...

खजिना म्हटलं की, आपल्या डोळयांसमोर भरपूर पैसा, दागदागिने, सोने-नाणे असं काहीसं येतं. पण, हा खजिना प्राप्त करण्याच्या प्रवासात आपल्याला आयुष्याचे वेगवेगळे आयाम अनुभवायला मिळतात. त्यातूनच जगण्याचा खरा प्रवास सुरू होतो. याच धर्तीवर आधारलेला आगामी मराठी चित्रपट ‘चरणदास चोर’ २९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमने अलिकडेच लोकमत आॅफिसला भेट दिली. लेखक -दिग्दर्शक श्याम महेश्वरी, अभिनेता अभय चव्हाण, सोनम पवार, आदेश आवारे यांच्याशी चित्रपटाविषयी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा आढावा खास तुमच्यासाठी...श्याम महेश्वरी यांचे लेखन-दिग्दर्शन आणि संजू होलमुखे यांचे क्रिएटिव्ह दिग्दर्शन असलेल्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटाचा पहिलाच पोस्टर फार गमतीदार आहे. चित्रपटाचे नाव जरी चरणदास चोर असले तरी पोस्टर मध्ये तरी चोर कुठे दिसत नाही. त्याऐवजी एक पत्र्याची सुंदर रंगवलेली ट्रंक रेल्वेच्या रुळावर ठेवलेली दिसते आहे. त्यामुळे चित्रपटातील हा चोर नक्की कोण याचीही उत्सुकता लागली आहे. पोस्टरची रंगसंगती पाहून सिनेमाचा लूक एकदम फ्रेश असणार यात काहीच शंका नाही. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक श्याम महेश्वरी यांना पेटीच्या रहस्याविषयी विचारले असता ते म्हणाले,‘या पेटीत नेमकं काय आहे? हा प्रश्न प्रत्येकालाच पोस्टर पाहून वाटते. मात्र, खरंतर यात मनोरंजन लपलेले आहे. या पेटीचे नाव ‘श्यामराव’ असे असते. प्रेक्षकांना या पेटीच्या माध्यमातून जो प्रवास घडणार आहे त्यामुळे आयुष्याशी निगडित छोट्या छोट्या गोष्टी, संदेश या चित्रपटातून नक्की अनुभवायला मिळतील. प्रेक्षक चित्रपटगृहातून एका संदेशासोबतच हसत -हसत बाहेर पडला पाहिजे. प्रेक्षकांसोबत माझा सिनेमा क नेक्ट व्हायला हवा, याकडे माझे विशेष लक्ष होते.  अभिनेता अभय चव्हाण यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले,‘अभिनेता म्हणून ‘चरणदास चोर’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटामुळे मला असे वाटते आहे की, मी आता मराठी इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. या चित्रपटाकडून मी बरंच काही शिकला आहे. एक अभिनेता म्हणून मला या चित्रपटातून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करणार नाही, याची मला खात्री आहे. चित्रपटात मी शहराकडून गावाकडे कसा जातो? १०० रूपये खिशात असतांनाही घामेघूम असणारा मी, माझ्याकडे जेव्हा मोठी पेटी येते तेव्हा काय होते? हे पडद्यावरच पाहणे योग्य असे मला वाटते.’चित्रपटातील अभिनेत्री सोनम पवार हिला तिच्या व्यक्तिरेखेविषयी विचारले असता तिने सांगितले की, ‘माझी व्यक्तिरेखा खूपच मजेशीर असून सलोनी असे तिचे नाव आहे. ग्रामीण भागात राहत असली तरीही ती शिकलेली आहे. लहान मुलांसोबत खेळायला तिला आवडते. शामरावच्या प्रवासात ती देखील सहभागी असते. शामराव या पेटीचे काय होते? तिचा प्रवास हा प्रेक्षकांना पडद्यावरच अनुभवायला जास्त आवडेल. बालकलाकार आदेश सावारे याला त्याच्या अनुभवाविषयी विचारले असता तो म्हणाला,‘ माझ्या व्यक्तिरेखेचे नाव विष्णू असे आहे. चित्रपटाच्याबाबतीत मला खूप चांगला अनुभव आला आहे. चित्रपटात माझा काका खूप भोळा असतो पण, मी खुप हुशार असतो. शामराव मध्ये असलेल्या पैशांचे काय होते? हे पडद्यावरच पाहणे अधिक उत्तम!