Join us
Daily Top 2Weekly Top 5

'उर्मिलायन' महाकाव्यातून उलगडणार रामायणातली लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:38 IST

Urmilayan : 'उर्मिलायन' हे नवं कोरं पौराणिक नाटक १५ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे.

'सुमुख चित्र' निर्मित व 'अनामिका' प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं 'उर्मिलायन' (Urmilayan) हे नवं कोरं पौराणिक नाटक १५ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे नाट्यगृह दुपारी १२.३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा लेखक दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी सांभाळली आहे. सुमुख चित्र नाट्य क्षेत्रात वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती करत असून, सुमुख चित्र नाट्यसंस्थेची ही दुसरी नाट्य कलाकृती आहे. या नाटकाची निर्मिती सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव यांनी केली आहे.

उर्मिला...वाल्मीकींच्या रामायणातली एक उपेक्षित व्यक्तिरेखा. रामायणातील राम, सीता आणि रावण या तीन व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत उर्मिला ही व्यक्तिरेखा काहीशी अबोलच राहिली. या व्यक्तिरेखेला  बोलतं करणार आणि उर्मिलेच्या बाबतीतील असंख्य प्रश्नांच्या उत्तरांचा शोध ‘उर्मिलायन’ या नाटकातून घेण्यात येणार आहे. १६ कलाकारांच्या संचाने हे नाटक सजलं आहे. नाटकाचे नेपथ्य अरुण राधायण तर संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. 

नाटकात दिसणार हे कलाकार

देवत्वाच्या स्पर्शापासून वंचित राहिलेली आणि कदाचित त्यामुळेच माणूसपणाच्या सगळ्या भावभावना आसक्तीने जगणारी एक हाडामांसाची जिवंत व्यक्ती म्हणून तिचा अभ्यास केला, तर ही अनन्यसाधारण व्यक्तिरेखा हृदयात अगदी खोलवर घाव करू लागते, जिची काहीही चूक नसताना सुद्धा जिला पती असतानाही विनाकारण वनवास भोगावा लागला, या चौदा वर्षांच्या खडतर जीवनप्रवासात जगण्याचा आणि स्वतःला जागवण्याचा संघर्ष कसा केला असेल ? काय घडलं असेल तिच्या शापित कथायुष्यात? काय असतील तिचे प्रश्न जे मानवी जीवनाला दर्शनस्वरूप मूल्य देणारे असतील, काय असेल तिच्या या जीवन प्रवासाचं आयन? मानवी अस्तित्वाच्या मुळापर्यंत भिडू पहाणार्‍या या अनादी अनंत प्रश्नांचा भेदक चेहरा म्हणजे ‘उर्मिलायन’. कल्पिता राणे, पुजा साधना, श्रावणी गावित, मृणाल शिखरे,निकिता रजक, सुप्रिया जाधव, प्रियांका अहिरे, अमोल भारती,  शिवानी मोहिते, अजय पाटील, शुभम बडगुजर, पराग सुतार,  दिवेश मोहिते सोहम पवार,प्रणव चव्हाण  आणि उर्मिलेच्या भूमिकेत  निहारिका राजदत्त हे कलाकार दिसणार आहे.