Join us
Daily Top 2Weekly Top 5

​उर्मिला कानेटकर-कोठारेने घेतली विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबीयांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 13:42 IST

‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर वयाच्या अकराव्या वर्षापासून घुंगरांच्या तालावर नाचू लागल्या. विठाबाईंनी वयाच्या सत्तरीपर्यंत महाराष्ट्रात तमाशा फड गाजवला. तमाशा या ...

‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर वयाच्या अकराव्या वर्षापासून घुंगरांच्या तालावर नाचू लागल्या. विठाबाईंनी वयाच्या सत्तरीपर्यंत महाराष्ट्रात तमाशा फड गाजवला. तमाशा या लोककलेला त्यांनी सरकार दरबारी आणि जनमानसात प्रतिष्ठा मिळवून दिली. या कलेसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळवूनही उतारवयात त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यांच्या आयुष्यावर आधारित विठा हा मराठी चित्रपट लवकरच येणार असून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे या चित्रपटात विठाबाईंची भूमिका साकारणार आहे. तिने नुकतेच विठाबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या परिवाराला भेट दिली.याविषयी उर्मिला सांगते, "विठाबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त मी नारायणगावला गेले होते. माझ्यासोबत विठा या चित्रपटाची संपूर्ण टीम होती. आम्ही तिथे त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्या ज्या घरात राहात होत्या, त्या घरात मी गेले, हा सगळा अनुभव खूपच स्पेशल होता. तिथे मी त्यांची मोठी मुलगी मंगला बनसोडे यांना भेटले. त्या अगदी विठाबाईंप्रमाणेच दिसतात, त्यांची देहबोलीदेखील त्यांच्याचप्रमाणे आहे. मी विठाबाई यांच्या अनेक मुलाखती, डॉक्युमेंट्रीज पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मंगला बनसोडे यांच्यात मला सतत विठाबाईंचीच झलक जाणवत होती. विठाबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंगला यांनी लाज धरा पाव्हनं जरा जनाची मनाची...पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?... या लावणीवर नृत्य सादर केले. त्यांचे नृत्य पाहून मी भारवून गेले होते. तसेच विठाबाई रोज ज्या मुक्ताईच्या देवळात जात असे, त्या देवळातदेखील मी जाऊन आले."