अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) वेगवेगळ्या भूमिकांमधून सध्या समोर येत आहे. रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' मध्ये त्याने केलेली भूमिका सर्वांनीच डोक्यावर उचलून धरली. उपेंद्रने मराठी, हिंदी आणि साउथमध्ये अभिनयाचा डंका गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने रजनीकांत (Rajinikanth) यांच्यासोबत फोटो पोस्ट केला होता. हा प्रचंड व्हायरल झाला. या भेटीमागचा किस्सा नुकताच उपेंद्रने सांगितला.
उपेंद्र लिमयेने रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा तो क्षण काय होता याचं वर्णन केलं. तसंच रजनीकांत त्याच्याशी मराठीत काय बोलले हेही सांगितलं. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, "रजनीकांत सरांना भेटून लयंच भारी वाटलं राव. मी त्यांचा सुरुवातीपासूनच चाहता आहे. त्यांची अजब स्टाइल, अफाट लोकप्रियता हे सर्व मी बघितलं होतंच. नुकतीच त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या व्हॅनिटीबाहेर नेहमीच प्रचंड गर्दी असते. काही खास लोकांनाच त्यांच्या मेकअपरुममध्ये बोलावून फोटो काढायची परवानगी असते. त्या खास लोकांमधला मी एक होतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मेकरुपमचा दरवाजा उघडला आणि माझ्यासमोर खुद्द रजनी सर होते. सुपरस्टार चा दर्जा, यश आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जाणवलं. मी त्यांना पाहून नमस्कार केला आणि म्हणालो, 'मला माहित आहे तुम्हाला मराठी येतं. म्हणून मला तुमच्याशी मराठीतच बोलू द्या'. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, 'माझं मराठी ते बेळगावकडचं बरं का'. "
तो पुढे म्हणाला, "त्यांनी माझं तेलुगूमधील काम बघितलं होतं. इतकंच नाही तर काम छान झालंय असंही त्यांनी मला सांगितलं. या दिग्गज व्यक्तीने माझं काम पाहिलंय आणि त्यांना आवडलंय हे समजल्यावर मी मनोमन सुखावलो होतो. मी त्यांच्याशी भरभरुन बोललो. शब्दांची जुळवाजुळव करत त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेलं स्थान आणि विशेष म्हणजे ते मराठी असल्याचा सगळ्यांना अभिमान वाटतो हेही सांगितलं. विशेष म्हणजे ते आपलं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकतात हे पाहून भारी वाटलं. त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं ती भावनाही विलक्षण होती. मायेचा ओलावा, आपुलकी जाणवली. ही भेट मला कमालीची ऊर्जा देऊन गेली याच शंका नाही."