Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बघतोस काय मुजरा कर’ चित्रपटातून गड-किल्ल्यांचे महत्त्व समजेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:35 IST

 महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे  करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले . याच सर्व गड किल्ल्यांचे ...

 महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे  करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले . याच सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच समजेल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले पन्हाळा येथे या चित्रपटाच्या संगीत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले. पुढे खासदार संभाजीराजे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक चित्रपट तयार झाले किंबहुना अनेक तयार होतील पण ज्या मातीत ते राहत होते त्या किल्ल्यांवर हा चित्रपट तयार झालाय याचा मला अभिमान आहे. मी सुद्धा महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे हीच मागणी करत आहे कि गड किल्ले हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा चालता-बोलता इतिहास आहे. हा ठेवा आपण जपला पाहिजे. मी अनेक गड किल्ले पाहिले आहेत.  जवळपास प्रत्येक गड किल्ल्यांवर अनेक लोकांनी नको तो मजकूर रंगवून ठेवला आहे ते बघून मनाला खूप क्लेश होतो. इथे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारचा कोणताही क्लेशदायक प्रकार थांबला पाहिजे. हा आपला अनमोल ठेवा आहे तो सर्वांनी जपावा आणि हि आपली सामाजिक जबाबदारी आहे.” हा  सामाजिक जबाबदारीचा मोलाचा विचार मनोरंजनाच्या माध्यमातून मांडणाऱ्या या चित्रपटाला खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भरभरून शुभेच्छा सुद्धा दिल्या. या चित्रपटाचा अभिनेता जितेंद्र जोशी म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन काम करत होते. त्यामुळे जातीपातीचे राजकारण महाराजांच्या नावावर करू नये. माणसाची जातपात पाहू नये त्याचे कर्तृत्त्व पाहावे असे मला वाटते. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मावळ्यांनी आपले रक्त सांडून हा इतिहास घडवला आहे. याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे .”किल्ले पन्हाळा येथे झालेल्या संगीत लोकार्पण सोहळ्याला या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, निर्माते गोपाल तायवाडे -पाटील आणि निर्माती वैष्णवी जाधव, चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकार जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, रसिका सुनील, पर्ण पेठे, संगीतकार अमितराज, पन्हाळा नगराध्यक्षा सौ.रुपाली धडेल, कोल्हापुर म.न.पा.नगरसेवक सचिन पाटील, पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका आणि असंख्य शिवभक्त उपस्थित होते. 'बघतोस काय मुजरा कर ' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे .आम्ही सर्व कलाकार गड-किल्ल्यांचे  संवर्धन करण्यासाठी इथून पुढे खासदार संभाजी राजेंसोबत काम करायला तयार आहोत, असा निर्धार अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव,  हेमंत ढोमे व संगीतकार अमितराज यांनी केला.