Join us

प्रिया बापटसोबत तुलना करणाऱ्यांना उमेश कामतचं प्रत्युत्तर; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:08 IST

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. या कपलची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. प्रिया आणि उमेश हे दोघे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. प्रियाने सिटी ऑफ ड्रिम्स या हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले होते आणि यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यामुळे नेटकऱ्यांनी प्रिया हिंदीत जम बसवताना दिसते आहे, यावरून उमेशची तुलना केली होती. दरम्यान आता एका मुलाखतीत उमेशने तुलना करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

एका मराठी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उमेश कामतने, तू मराठीत काम करतो आहेस आणि प्रिया हिंदीत नाव कमावते आहे, असे म्हणत त्यांची सोशल मीडियावर तुलना करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला की, मला आणि प्रियाला यामुळे काहीही फरक पडत नाही. मला हिंदीत काम करण्याचे आकर्षण कधीच नव्हते. मी अभिनय हे करिअर म्हणून निवडले  तेव्हा फक्त चांगले काम करायचे ठरविले. त्यामुळे हिंदीमध्ये काही चांगली संधी मिळाली तर नक्कीच करेन. मात्र आता मला मराठी सिनेइंडस्ट्रीत उत्तम काम करायला मिळत आहे तर मी हे का सोडावे? एकमेकांचं कौतुक झाल्यावर आम्हाला दोघांना आनंदच होतो.

प्रिया आणि उमेशची लोकप्रिय वेबसीरिज आणि काय हवंचा तिसरा सीझन काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आधीच्या दोन सीरिजप्रमाणे तिसऱ्या सीझनलादेखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.

तर सध्या उमेश सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत काम करताना दिसतो आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापटमुक्ता बर्वे