Join us

​उबुंटू चित्रपटाच्या टीमने लोकमत ऑफिसला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:02 IST

उबुंटू चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री आणि या चित्रपटातील बालकलाकारांनी लोकमत ऑफिसला नुकतीच उपस्थिती लावली होती. त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ...

उबुंटू चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री आणि या चित्रपटातील बालकलाकारांनी लोकमत ऑफिसला नुकतीच उपस्थिती लावली होती. त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी झालेल्या गमंती जमती सांगितल्या. तसेच या चित्रपटाच्या एकंदर प्रवासाविषयी गप्पा मारल्या.उबुंटू या चित्रपटाचा दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री सांगतो, शाळा आणि लहान मुले हे दोन्ही माझे अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळेच या चित्रपटाद्वारे एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. एका छोट्याशा गावातील शाळकरी मुले आपली शाळा वाचवण्यासाठी काय काय करतात याचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक बालकलाकार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही सांगली आणि कुडाळ येथे केले आहे. या चित्रीकरणाच्या दरम्यान कोणत्याच मुलांचे आई-वडील उपस्थित नव्हते. मीच त्यांना एखाद्या पालकांसारखे सांभाळले आहे. त्यांच्यासोबत मी मजा-मस्ती देखील करायचो. त्यामुळे या टीमसोबत काम करताना खूप मजा आली.उबुंटू या चित्रपटात प्रेक्षकांना सुबोध भावेचा मुलगा कान्हादेखील पाहायला मिळणार आहे. तो या चित्रपटात संकेतची भूमिका साकारत आहे. कान्हाला सुबोध भावेचा मुलगा म्हणून ओळख सांगितलेली आवडत नाही. तो सांगतो, माझे नाव फक्त कान्हा आहे. मी या चित्रपटात शाळेत दादागिरी करणाऱ्या, नेहमी मस्तीच्या मुडमध्ये असणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. कान्हा खऱ्या आयुष्यातही खूप मस्तीखोर असून त्याला बडबड करायला खूप आवडते. त्याच्यासोबतच त्याच्या शाळेतला शुभम पवार या चित्रपटात आहे. शुभमला या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी कान्हाच घेईन आला होता. याविषयी शुभम सांगतो, मला कान्हा ऑडिशनसाठी घेऊन गेला होता. मला तर सुरुवातीला आम्ही कोणत्या तरी वर्कशॉपसाठी जात आहोत असेच वाटत होते. पण माझे ऑडिशन चांगले झाले आणि या चित्रपटाचा मी भाग बनलो. आपली शाळा वाचवण्यासाठी मी या चित्रपटात खूप सारे प्रयत्न करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. पण खऱ्या आयुष्यात माझी शाळा बंद होत आहे असे मला कोणी सांगितले तर मी असे काही प्रयत्न करणार नाही असे देखील तो मस्करीत सांगतो. पण माझी शाळा बंद झाली तर माझ्या मित्रमैत्रिणींना मी खूप मिस करेन असे देखील तो कबूल करतो. या त्याच्या वक्तव्यातून त्याच्यातील निरागसता आपल्याला पाहायला मिळते.या चित्रपटात पूर्वेश कोटिअन माधव ही भूमिका साकारत आहे. माधव हा शाळाच आपले सर्व काही आहे असे मानणारा मुलगा आहे. पूर्वेश हा सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे. पूर्वेश दक्षिण भारतीय असला तरी त्याचे मराठी खूपच चांगले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी पूर्वेश सांगतो, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही खूप मजा केली. पुष्कर सरांनी आमचे खूप लाड पुरवले. आम्हाला चिकन लॉलीपॉप आवडतात. त्यामुळे ते रोज रात्री चिकन लॉलीपॉप मागवत असत.बालक पालक या चित्रपटात चिऊची भूमिका साकारलेली भाग्यश्री संकपाळ या चित्रपटात गौरी ही भूमिका साकारत आहे. भाग्यश्री सांगते, या चित्रपटात गौरी या सगळ्या मुलांची लीडर आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. मी या चित्रपटाच्या सेटवरदेखील या सगळ्यांना खूप समजून घ्यायची. पुष्कर सर जर कामात जास्त व्यग्र असतील तर या मस्तीखोर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ही आम्हा मुलींवरच असायची. या चित्रपटात अथर्व पाध्ये अब्दुलची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेविषयी तो सांगतो, मी या चित्रपटात अतिशय हुशार मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही कुडाळमध्ये केले. कुडाळमध्ये तर आम्ही खूप मजा केली. त्या संपूर्ण गावात आमचाच किलबिलाट असायचा. कान्हा तर गावातील सगळ्यांचा लाडका बनला होता. तो गावातील लोकांच्या घरात जाऊन जेवायचादेखील. सांगलीमध्ये चित्रीकरण करतानाचा अनुभव सांगताना या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत सांगतो, पुष्कर हा प्रसिद्ध अभिनेता असल्याने त्याच्यासोबत भर रस्त्यात चित्रीकरण करणे कठीण जाणार याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे सांगलीत चित्रीकरण करताना पुष्करसाठी आम्ही एक खास मास्क बनवून घेतला होता. तो हा मास्क घालून काम करत असे. उबुंटू हा चित्रपट कालच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेबल फॅक्टरी या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत पुष्कर श्रोत्रीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्वरूप रिक्रिएशन अँड प्रा.लि हे या चित्रपटाचे सादरकर्ते आहेत. या चित्रपटाची कथा ही पुष्करचीच असून अरविंद जगताप, पराग ओझा आणि पुष्कर यांनी मिळून या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात शशांक शेंडे, सारंग साठ्ये, उमेश जगताप, भाग्यश्री संकपाळ, कान्हा भावे, अथर्व पाध्ये, आरती मोरे, शुभम पवार, आर्या हाटकर, पूर्वेश कोटीअन, चैत्राली गडकरी, आर्या सौदागर, बाळकृष्णा राऊळ, योगिनी पोफळे, स्मृती पाटकर, कल्पना जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. Also Read : अमिताभ बच्चन यांनी उंबुटू मराठी सिनेमाचे जाहीरपणे केले कौतुक,सिनेमाचा ट्रेलर पाहण्याचे केले आवाहन