Join us  

'हा काय हिरो आहे का?' शरीरयष्टी अन् लूकमुळे प्रथमेश परब झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 3:06 PM

Prathamesh Parab: बॉडी शेमिंग करणाऱ्यांना प्रथमेशने दिलं सडेतोड उत्तर

'टाईमपास','टकाटक', 'बालक-पालक' अशा कितीतरी सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (Prathamesh Parab). मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या प्रथमेशच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आजवर प्रथमेशने केलेल्या प्रत्येक सिनेमामधून त्याने तरुणाईचं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. आज मराठी कलाविश्वात त्याने त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात अनेकांनी त्याला त्याच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं.

मध्यंतरी प्रथमेशने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने ट्रोलिंगविषयी भाष्य केलं आहे. आपल्या दिसण्यावरुन, शरीरयष्टीवरुन लोकांनी अनेक पद्धतीने नाव ठेवायचा प्रयत्न केला हे त्याने सांगितलं. 

"तरुणांसाठीच्या सिनेमांवर द्वयर्थी संवाद वा शिव्या यासाठी टीका होते ते मान्य आहे. परंतु, नव्या पिढीचा दृष्टीकोन काय आहे ते न पाहता टीका करणं चूक आहे. ‘टकाटक’सारखा विषय हा सेक्स एज्युकेशनवर होता. तर ‘एक नंबर’ आणि ‘डार्लिंग’हे सिनेम युथफुल होते. त्यामुळे ते विषय त्याच भाषेत सांगितले नाहीत. तर लोकांना ते पटतील का? तरुणांची भाषा, कट्टे, सोशल मीडिया ग्रुप हे सगळं मी स्वतः कॉलेजमध्ये जात असल्यानं पाहतो. मग हेच सगळं पडद्यावर आलं, तर काय बिघडलं?" , असं प्रथमेश म्हणतो.

पुढे तो म्हणतो, "पण, वाईट या एका गोष्टीचं वाटतं की लोक सिनेमासोबत कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक जीवनावरुन ट्रोल करतात. हा काय हिरो आहे का?, तो कसा दिसतो? असं लोक बोलतात. विशेष म्हणजे लोक टीका करतात तीदेखील अगदी समोर येईन करतात. पण, मला आता त्याची सवय झालीये. ट्रोलिंगचा जमाना आहे. लोकांनी ते खुशाल करावं. आपण आपलं काम करत रहायचं."

दरम्यान, प्रथमेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात एकांकिकेपासून केली होती. त्यानंतर नाटक, सिनेमा असा त्याचा प्रवास सुरु झाला. प्रथमेशने कमी कालावधीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. येत्या काळात ‘ढिशकॅव’, ‘होय महाराजा’ हे त्याचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

टॅग्स :प्रथमेश परबसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमानाटक