छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) मुख्य भूमिकेत असलेल्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी'चे दिग्दर्शनही रितेशच करतो आहे. दरम्यान आता या सिनेमात मराठी मालिकाविश्वातील एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. खुद्द त्यानेच सोशल मीडियावर सांगितलं आहे. हा अभिनेता कोण आहे. हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना.
'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागलेला मालिकाविश्वातील अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून कपिल होनराव आहे. त्याने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम केले होते. त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, ''२०२४ हे वर्ष माझ्यासाठी थोडं कठीण वर्ष होतं. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला मनोभावे प्राथना केली होती की, पुढील नवरात्रीपर्यंत काही तरी मोठ होऊ दे आणि ज्यांना पाहून मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो माझे आदर्श अशा रितेश विलासराव देशमुख यांच्या #राजाशिवाजी ह्या चित्रपटाचा मी भाग झालो.''
त्याने पुढे लिहिले, ''रोहन मापुसकर या मराठीमधल्या सगळ्यात मोठ्या कास्टिंग डिरेक्टरने माझे या सिनेमासाठी कास्टिंग केलं. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांसोबत बालपणापासून ज्यांनी योगदान दिलं अशा मावळ्याची भूमिका मला करायला मिळते आहे. आज तुमच्या सोबत हे क्लॅप शेयर करतोय... घटस्थापनेचा हा दिवस व आज पासून सुरू होणारी नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती व प्रेमाची वृद्धी करो हीच आमच कामना. आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभकामना..!'' कपिल होनरावच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल'राजा शिवाजी' सिनेमाची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. यात रितेश शिवाय संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशी स्टारकास्ट आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे.