शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे. संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ह्या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसतील. दोस्तीगिरी सिनेमात हे पाचजण जेवढे घट्ट मित्र-मैत्रिण आहेत. तेवढीच त्यांची सिनेमाच्या सेटवर एकमेकांशी दृढ मैत्री झाली आणि दोस्ती झाल्यावर तर मस्ती झालीच पाहिजे.
संकेत पाठक ह्याविषयी सांगतो, “आम्ही पाचजणांनी सिनेमाच्या सेटवर जी मस्ती केलीय, त्याची एक वेगळी फिल्मच बनेल. आणि तिचं नाव दोस्तीगिरी पार्ट 2 होऊ शकेल असं मला वाटतं. रत्लागिरीच्या शेड्युलच्यावेळी बाजीराव मस्तानी सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी रोज चित्रकरणाच्यावेळी ब्रेक मिळाल्यावर आम्ही त्यातल्या गाण्यांवर नाचायचो. एवढेच नाही, तर आम्ही आमच्या-आमच्यात बाजीराव, मस्तानी, पंत, काशीबाईची कास्टिंगही केली होती. आणि त्यावरून खूप मस्तीही केलीय.”
अक्षय वाघमारे सांगतो, “माझी आणि संकेतची बॉन्डिंग फिटनेसमूळे झाली होती. तर विजय त्याच्या नावाप्रमाणेच ऑफसेट आम्ही खेळत असलेल्या प्रत्येक गेम्समध्ये जिंकायचा. पूजा जयस्वालचं तर आम्ही अक्षरश: रॅगिंग केलंय.”
पूजा जयस्वाल म्हणते, “हो, मला रोज एका विशीष्ठ नंबरवरून कॉल यायचा. मला वाटायचं मला कोणी ‘स्टॉक’ करतंय. मी त्याविषयी संकेत, अक्षय, विजयला सांगितलं होतं. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी मी जेव्हा अक्षयच्या नंबरवरून मला कॉल केला. तेव्हा मला लक्षात आलं की, हा स्टॉकर दूसरा तिसरा कोणी नाही तर अक्षय होता. आणि मला सतावण्याचा अक्षय-संकेतचा हा प्लॅन होता.”
विजय गीते सांगतो, “रत्नागिरीतले चित्रीकरण आम्हां सर्वांसाठीच आठवणीतले आहे. कारण आम्हांला ह्या चित्रीकरणावेळीच जीवाभावाचे दोस्त मिळाले. आज मी हक्काने ह्या मित्रांचे मला आलेल्या चित्रपटाच्या ऑफरपासून ते खासगी आयुष्यातल्या अनेक गोष्टींबाबत सल्ले घेत असतो.”
पूजा मळेकर म्हणते,”जेवढी दोस्ती घट्ट, तेवढी मस्ती जास्त... हाच आमच्याही दोस्तीचा नियम आहे. आमची हीच दोस्ती आणि त्यातली मस्ती तुम्हांला मोठ्या पडद्यावरही 24 ऑगस्टला पाहता येईल. “
संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित "दोस्तीगिरी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन ह्यांचे संगीत असलेला दोस्तीगिरी चित्रपट 24 ऑगस्ट 2018 ला रिलीज होणार आहे.