'मनाचे श्लोक' (Manache Shlok Movie) चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मनवा आणि श्लोकच्या जोडीलाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या धमाल टीझरमुळे प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याच उत्सुकतेत भर घालत चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'तू बोल ना' या गाण्यात मनवा आणि श्लोक यांच्या नात्यात फुलणारं प्रेम पाहायला मिळत आहे. त्या दोघांचे गोड क्षण या गाण्यात दिसत आहेत. या सुंदर गाण्याला तुषार जोशी यांचा मधुर आवाज लाभला असून गौतमी देशपांडेने या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर सिद्धार्थ व सौमिल यांच्या सुरेल संगीताने हे गाणं अधिकच जबरदस्त बनले आहे.
या गाण्याचे चित्रीकरण हिमालयात झाल्याने त्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. यात मनवा आणि श्लोकची केमिस्ट्री पाहायला मिळत असून या दोघांचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, ''या चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. हिमालयात हे गाणं चित्रित केल्यानं हे दिसतानाही सुंदर दिसतेय आणि त्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभवही अत्यंत सुंदर होता आणि प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल.''
'मनाचे श्लोक' हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.