Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा मनसेच्या दीपोत्सवातील व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट, म्हणाली, "साहेब हे सगळं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:56 IST

मनसेच्या दीपोत्सवातील राज ठाकरेंचा एक व्हिडओ मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शेअर केला आहे.

देशात सर्वत्र दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दरवर्षी मनसेकडून दादर येथील शिवाजी पार्कमध्ये विद्युत रोषणाई केली जाते. यंदाही मनसेतर्फे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. या दीपोत्सवातील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. 

मनसेच्या दीपोत्सवातील राज ठाकरेंचा एक व्हिडओ मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शेअर केला आहे. या व्हिडिओत राज ठाकरे बाल्कनीत पाठमोरे उभे असल्याचं दिसत आहे. फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. "ह्या अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद साहेब! हे सगळं तुम्हीच करू जाणे..." असं कॅप्शन तिने स्टोरीला दिलं आहे. दीपोत्सव २०२३ आणि राजसाहेब ठाकरे हे हॅशटॅगही तिने स्टोरीमध्ये वापरले आहेत. तेजस्विनीच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

तेजस्विनी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. तेजस्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. समाजातील अनेक घडामोडींवर ती स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेअर करत टोलनाक्याबाबत केलेल्या ट्वीटमुळे ती चर्चेत आली होती. तेजस्विनीने राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बघण्याची इच्छा असल्याचं लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.  

टॅग्स :राज ठाकरेतेजस्विनी पंडितसेलिब्रिटींची दिवाळी