रेमो डिसोझा गावठीच्या टीमसोबत थिरकला ‘दिसू लागलीस तू’ या गाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 11:47 IST
जसा व्हॅलेन्टाईन डे जवळ येतो तसे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी येतात. प्रत्येक व्हॅलेन्टाईन दिवशी काही तरी खास ...
रेमो डिसोझा गावठीच्या टीमसोबत थिरकला ‘दिसू लागलीस तू’ या गाण्यावर
जसा व्हॅलेन्टाईन डे जवळ येतो तसे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी येतात. प्रत्येक व्हॅलेन्टाईन दिवशी काही तरी खास गिफ्ट किंवा नवीन काही तरी करण्याचे मनसुबे आखले जातात. पण, यंदाच्या व्हॅलेन्टाईनला सुप्रसिद्ध नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोझाने एका विशेष संगीतमय नजराण्याचे अनावरण केले आहे. हा नजराणा म्हणजे आगामी येणाऱ्या गावठी या चित्रपटातील एक रोमँटीक गाणे आहे. ‘दिसू लागलीस तू’ हे अश्विन भंडारे यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेले प्रेमगीत एका दिमाखदार सोहळ्यात रेमो डिसोझा यांनी व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट म्हणून तरूणाईला समर्पित केले.गावठी चित्रपटाचा लेखक तसेच दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) गेली पंधरा वर्षं रेमो डिसोझाचा साहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यामुळे या प्रेम गीताच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला रेमो आपल्या पत्नी लीझलसोबत उपस्थित होता. या चित्रपटातील प्रेम गीतासाठी एक स्पेशल सिग्नेचर डान्स स्टेप कोरिओग्राफर आनंदकुमारने चित्रीत केली आहे.गावठी या गाण्याचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपटातील हिरो-हिरॉईन श्रीकांत आणि योगिता हे नवोदित कलाकार सोहळ्यात ‘त्या’ प्रेम गीतावर बहारदार नृत्य सादर करत असताना दिसले. रेमो डिसोझा आणि दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) यांनी न राहावल्याने स्टेजवर अचानक एंट्री घेतली आणि उपस्थितांनीही त्या स्पेशल डान्स स्टेपवर ताल धरला.‘दिसू लागलीस तू’ हे व्हॅलेन्टाईन स्पेशल प्रेम गीत आणि स्पेशल डान्स स्टेप गावठी सिनेमाच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युब चॅनलवर पाहायला मिळेल. या सोहळ्यात गावठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण प्रसिद्ध उद्योजक किशोर गुलगुले आणि रेमो यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आर. बी. प्रोडक्शनचे निर्माते आणि कथा लेखक सिवाकुमार श्रीनिवासन, चित्रपटातील कलाकार नागेश भोसले, वंदना वाकनीस, संदिप गायकवाड, गौरव मोरे, सदानंद यादव, सिनेमॅटोग्राफर अजीत रेड्डी, संगीतकार अश्विन भंडारे – श्रेयस आंगणे, पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दीक्षित-ऋषिकेश भिरंगी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गावठी हा तिरस्काराने उच्चारलेला शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आर. बी. प्रोडक्शन निर्मित चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. Also Read : गावठी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सरसावला रेमो डिसोझा